Corona Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सनची लस आयात करण्याची परवानगी द्या; Reliance ची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 12:32 PM2021-06-05T12:32:24+5:302021-06-05T12:41:52+5:30

Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी होताना पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे चिंता कायम आहे.

कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण हाच उपाय आहे. यासाठीच लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला असून, लहान मुलांना याचा जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचण्यांना प्रारंभ झाला आहे.

देशामध्ये आताच्या घडीला सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असली, तरी आणखी तीन ते चार परदेशी लसींना भारत सरकार परवानगी देण्याच्या तयारीत आहेत.

यातच आता प्रसिद्ध तसेच लोकप्रिय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची लस आयात करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.

Reliance Foundation ही एक परोपकारी संस्था असून, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (nita ambani) या कंपनीचे नेतृत्व करतात, असे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय रिलायन्सने घेतला असून, याच पार्श्वभूमीवर लस आयात करण्याची परवानगी मागण्यात आली आहे.

Reliance फाऊंडेशनने अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन व्हॅक्सिन या अमेरिकन कंपनीच्या लसीकरण आणि देशातील अंतर्गत वापरासाठी २० लाख डोसची आयात करण्याची सरकारकडे परवानगी मागितली.

जॉन्सन अँड जॉन्सनकडून आयात केलेली लस केवळ कंपनीमध्येच वापरली जाईल आणि ती व्यावसायिक हेतूंसाठी वापरली जाणार नाही. भविष्यात अन्य लस उत्पादकांकडून लस आयात करण्याची शक्यता असून, ती केवळ अंतर्गत कारणांसाठी वापरली जाईल.

Reliance फाऊंडेशनने सदर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिल्याचे सांगितले जात आहे. सन २०१० मध्ये रिलायन्स फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली असून, ती एक परोपकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.

Reliance फाऊंडेशनने सरकारला सांगितले आहे की, या अभूतपूर्व साथीच्या काळात कोरोना रुग्णालये आणि केअर सेंटर स्थापन करून विनामूल्य जेवण पुरवून समाजाला दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English