नव वर्षापासून अधिक नको, फक्त ५००० रुपये वाचवा; बघा कसे कोट्यधीश बनता ते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:44 AM2023-12-28T09:44:51+5:302023-12-28T10:00:53+5:30

पैशाची बचत करण्यासाठी अनेकजण नियोजन करत असतात. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बचतीची सुरुवात करा.

पैशाची बचत करण्यासाठी अनेकजण नियोजन करत असतात. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बचतीची सुरुवात करा. जर तुम्ही भविष्याबद्दल जागरूक असाल तर तुम्हाला वर्तमानात पुढे जावे लागेल. तुम्ही खासगी नोकरी करत असाल तर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण भविष्यातील आर्थिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य वेळी नियोजन केले पाहिजे.

२०२४ हे वर्ष काही दिवसातच सुरु होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजून भविष्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही, तर तुम्ही नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करू शकता. यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते, एकदा गुंतवणुकीचे पहिले पाऊल टाकले की आपोआपच उद्दिष्टे सोपे होतात.

या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे, प्रत्येकाचे ध्येय कोट्यधीश बनणे आहे. मात्र यासाठी गुंतवणुकीबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. आजच्या काळात कोट्यधीश बनणे अवघड काम नाही. कमी रक्कमेची बचत करुन तुम्ही मोठ्या पैशाची बचत करु शकता.

जर तुम्ही नवीन वर्षापासून म्हणजे २०२४ पासून प्रत्येक महिन्याला ५००० रुपये वाचवले तर तुम्ही किती दिवसात कोट्यधीश बनू शकता. मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी दरमहा ५००० रुपयांची बचत करणे अवघड काम नाही.

२०२३ पर्यंत तुम्ही विचारात वेळ घालवला असेल तर नवीन वर्षापासून या कामात सहभागी व्हा, काही वर्षांतच तुम्हाला कळेल की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पैशाची गरज नाही तर इच्छाशक्ती हवी.

त्यामुळे नवीन वर्षापासून तुम्ही दरमहा ५००० रुपये जमा करून कोट्यधीश होऊ शकता, तुम्ही एवढी मोठी कशी साठवू शकता याचे गणित समजावून घेऊ. यासाठी पैसे कुठे गुंतवायचे? आज म्युच्युअल फंडाबाबत सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात फक्त ५०० रुपये दरमहा SIP करू शकता, SIP हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे.

तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा ५००० रुपयांची SIP करता आणि त्यावर तुम्हाला वार्षिक १५% परतावा मिळत असेल, तर २२ वर्षांनी तुम्ही कोट्यधीश व्हाल. तुमच्याकडे एकूण १.०३ कोटी रुपये असतील. तर या २२ वर्षांत तुम्ही एकूण १३.२० लाख रुपये जमा कराल.

दुसरीकडे, जर वार्षिक परतावा १७ टक्के असेल, तर मासिक ५००० रुपये गुंतवून तुम्ही २० वर्षांत म्युच्युअल फंडातून १.०१ कोटी रुपये गोळा करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही दरमहा ५००० रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यात वार्षिक १० टक्के वाढ केली, तर १२ टक्के वार्षिक परताव्यावरही २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी रुपये होतील. याचा अर्थ, जर तुम्ही २०२४ पासून दरमहा ५००० रुपये SIP करत असाल तर २०४४ मध्ये तुम्ही फक्त १ कोटी रुपयांचे मालक व्हाल.

जर तुम्ही मासिक ५००० रुपये SIP करत असाल आणि गुंतवणूक वार्षिक १० टक्क्यांनी वाढली. पण जर त्यावर वार्षिक परतावा १५ टक्के असेल, तर तुम्हाला एकूण १,३९,१८,१५६ रुपये मिळतील, तर या कालावधीत तुम्ही एकूण ३४,३६,५०० रुपये गुंतवाल. हे फक्त ५००० रुपये प्रति महिना मोजले आहे, जे दरमहा किमान २५,००० ते ३०,००० रुपये कमावणारे लोक करू शकतात. गुंतवणुकीची रक्कम दुप्पट केली तर साहजिकच परतावाही दुप्पट होईल. म्हणून, २०२४ मध्ये गुंतवणुकीची सुरुवाात करा.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)