New Rules In June 2023: १ जूनपासून होणार ‘हे’ मोठे बदल, थेट खिशावर होणार परिणाम; पाहा डिटेल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 01:31 PM2023-05-26T13:31:17+5:302023-05-26T14:04:56+5:30

देशात दर महिन्याच्या १ तारखेला अनेक बदल होतात. १ जूनलादेखील काही बदल होणार आहेत.

आता मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर जून महिना सुरू होईल. देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक बदल घडतात. जूनच्या पहिल्या तारखेलाही अनेक बदल होणार आहेत (Rules Change From June 1, 2023). या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

अशा परिस्थितीत, या बदलांची आधीच माहिती असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. १ जूनपासून कोणते बदल होणार आहेत ते पाहूया.

सीएनजी आणि पीएनजी दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात बदलतात. पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅसच्या किमतीत बदल करतात.

जूनच्या सुरुवातीला सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती (CNG PNG Price in Delhi) कमी झाल्या होत्या. सीएनजी-पीएनजीच्या किमती जूनमध्ये बदलण्याची शक्यता आहे.

गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याच्या सुरुवातीला बदलतात. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती एप्रिलमध्ये कमी करण्यात आल्या होत्या. कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरची किंमत 92 रुपयांपर्यंत कमी केली होती. मे महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती.

१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १,८५६.५० रुपयांवर आली आहे. यामध्ये १७१.५० रुपयांची घट झाली आहे.

यापूर्वी दिल्लीत याची किंमती २०२८ रुपये होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती सलग दोन महिन्यांत कमी झाल्या होत्या. घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. यापूर्वी त्यात १ मार्च रोजी ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती.

देशात १ जून २०२३ पासून इलेक्ट्रिक दुचाकी महाग होणार आहेत. केंद्र सरकारने FAME-II (फास्टर एडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेंतर्गत १ जून २०२३ रोजी किंवा त्यानंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असलेले अनुदान कमी केले आहे.

अवजड उद्योग मंत्रालयाने या बदलाबाबत अधिसूचना जारी केली असून इलेक्ट्रीक दुचाकींसाठी मागणी प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे अनुदान १५००० रुपये प्रति किलोवॅट तासावरून १०००० रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आले आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक बाईकच्या किंमती २५ हजार ते ३५ हजारांपर्यंत वाढू शकतात.