हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन, मोठ्या कंपनीएवढं आहे वार्षिक उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:15 IST2025-01-06T12:08:56+5:302025-01-06T12:15:08+5:30

Indian Railway: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. प्रवासाचं आरामदायक आणि किफायतशीर साधन असल्याने भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. या माध्यमातून रेल्वेला हजारो कोटींचं उत्पन्न मिळतं. भारतात ७ हजार ३०८ रेल्वे स्थानकं आहेत. तेथून दररोज शेकडो ट्रेन धावतात. यापैकी काही स्टेशन लहान तर काही स्टेशन खूप मोठी आहेत. येथून प्रवास करणारे प्रवासी आणि इतर माध्यमातून भरपूर महसूल मिळतो.

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. प्रवासाचं आरामदायक आणि किफायतशीर साधन असल्याने भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. या माध्यमातून रेल्वेला हजारो कोटींचं उत्पन्न मिळतं. भारतात ७ हजार ३०८ रेल्वे स्थानकं आहेत. तेथून दररोज शेकडो ट्रेन धावतात. यापैकी काही स्टेशन लहान तर काही स्टेशन खूप मोठी आहेत. येथून प्रवास करणारे प्रवासी आणि इतर माध्यमातून भरपूर महसूल मिळतो.

केवळ प्रवाशांच्या तिकिटामधूनच नाही तर रेल्वे स्टेशनमधील जाहीराती, दुकानं, वेटिंग रूम आदींमधूनही रेल्वेच्या उत्पन्नात भरत पडते. दरम्यान, देशातील काही रेल्वे स्टेशन खूप मोठी आहेत. तर अनेक स्टेशन फार लहान आहेत. पैकी मोठ्या रेल्वे स्टेशनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. तसेच त्यांच्यामाध्यमातून कोट्यवधीचा महसूल मिळतो. दरम्यान, भारतीय रेल्वेला कुठल्या रेल्वे स्टेशनमधून सर्वाधिक कमाई होते. कमाईच्याबाबतीत कुठलं रेल्वे स्टेशन सर्वात मोठं आहे, हे आपण आज पाहुयात.

देशामधील सर्वाधिक उत्पन्न आणि महसूल मिळवणारं रेल्वे स्टेशन हे राजधानी दिल्लीतील नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन आहे. रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात नवी दिल्ली रेल्वे स्टेशनने सर्वाधिक कमाई केली आहे. रेल्वेला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमधून रेल्वेला ३ हजार ३३७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नवी दिल्ली कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं स्टेशन ठरलं. सोबतच या स्टेशनवरून २०२३-२४ मध्ये तब्बल ३ कोटी, ९३ लाख ६२ हजार २७२ प्रवाशांनी प्रवास केला.

पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्टेशन हे उत्पन्नाच्या बाबतील देशातील दुसऱ्या क्रमांकाचं स्टेशन ठरलं आहे. हावडा रेल्वे स्टेशनचं वार्षिक उत्पन्न १६९२ कोटी रुपये एवढं आहे.

तामिळनाडूमधील चेन्नई सेंट्रल हे उत्पन्नाच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचं रेल्वे स्टेशन ठरलं आहे. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनने वर्षभरात १२९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षभरात या रेल्वे स्टेशनमधून ३ कोटी ५ लाख ९९ हजार ८३७ प्रवाशांनी प्रवास केला.

कमाईच्या बाबतीत तेलंगाणामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशन हे चौथ्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सिकंदराबाद स्टेशनमधून रेल्वेला १२७६ कोटी रुपयांची कमाई केली. तर येथून २ कोटी ७७ लाख ७६ ९३७ प्रवाशांनी प्रवास केला.

रेल्वेला महसूल मिळवून देण्याच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकावर असलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये दिल्लीतील आणखी एका स्टेशनने स्थान मिळवलं आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पाचव्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ मध्ये हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनने १२२७ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं. तसेच वर्षभरात या रेल्वेस्टेशनमधून १ कोटी ४५ लाख ३७ हजार ६८७ प्रवाशांनी प्रवास केला.

दरम्यान, कमाईच्या बाबतीत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पहिल्या क्रमांकावर असलं तरी प्रवासी संख्येच्या आधारावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पहिल्या क्रमांकाचं स्टेशन आहे. येथून ५ कोटी १६ लाख ५२ हजार २३० प्रवाशांनी प्रवास केला.