लखनौच्या मुलीनं महाराष्ट्रात सुरु केला व्यवसाय; वर्षाला १ कोटींची उलाढाल, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:02 IST2024-12-17T09:53:07+5:302024-12-17T10:02:30+5:30

एका आईची चिंता, शुद्ध दुधाचा शोध आणि यशस्वी उद्योगाची उभारणी...ज्योती पद्मा यांना त्यांच्या नवजात मुलीचा लॅक्टोज इनटॉलरन्सविषयी कळालं तेव्हा त्यांनी शुद्ध दूध शोधण्याचा प्रयत्न केला. लॅक्टोज इनटॉलरन्स हा ५ वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. लॅक्टोज ही एक प्रकारची साखर आहे. जी प्राणी आणि स्तनपान देणाऱ्या मातेच्या दुधातही आढळते. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.
ज्योती पद्मा यांनी वेगवेगळ्या ब्रँडची आणि विविध स्थानिक दुकानदारांकडून दूध घेतले परंतु त्यांच्या मुलीला पचनाच्या समस्येपासून आराम मिळत नव्हता. त्यावेळी त्यांच्या लखनौ येथे राहणाऱ्या बहिणीने त्यांच्या फार्ममधील दूध पाठवलं. तेव्हा ज्योती यांच्या मुलीला कुठलाही त्रास न होता पचन क्रिया व्यवस्थित झाली. तिथूनच ज्योती यांना A2 दुधाचं महत्त्व कळाले.
ज्योती पद्मा यांनी स्वत: त्याची सर्व माहिती घेतली त्यानंतर ठाण्यात श्री बालकृष्ण डेअरी फार्म नावाने स्वत:चा डेअरी व्यवसाय सुरू केला. या डेअरीत गायींना सेंद्रिय खाद्य दिले जाते आणि हाताने दूध काढले जाते. त्यानंतर ग्राहकांना A2 दूध काही तासांतच त्यांच्या घरपोच पोहचवले जाते.
डेअरीसोबतच ज्योती यांनी काऊ करेन्सी नावाची अनोखी मोहिम सुरू केली. ज्यात शहरी भागातील लोक विना गायी पाळण्यापासून त्याची देखभाल न करता A2 दूध आणि तूप प्राप्त करू शकतील. पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले दूध हा चांगला पर्याय नाही आणि म्हणूनच त्यांनी ही सुरुवात केली. टेक्सटाइल इंजिनिअरींग पदवीधर असलेल्या ज्योती सांगतात की, माझी शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मी जे काही केले आहे ते प्रयोग करून आणि स्वतः शिकून केले आहे. ज्योतीने लखनौमध्ये १५ गायींसह त्यांचे पहिले फार्म तयार केले, ज्यात जर्सी आणि साहिवाल सारख्या जातींचा समावेश होता.
ठाण्यात आल्यानंतर ज्योतीने शहरी भागात शुद्ध A2 गायीच्या दुधाची वाढती गरज ओळखली आणि त्या दिशेने काम सुरू केले. त्यांचं बालपण उत्तर प्रदेशात गेले आहे तिथे ताज्या दुधावर फारसा जोर नाही. जेव्हा त्याच्या मुलीला शुद्ध दुधाची गरज होती, तेव्हा त्यांना कळलं की ती एक गरज आहे.
२०१९ मध्ये ज्योतीने महाराष्ट्रात दोन एकर भाडेतत्त्वावरील जमिनीवर श्री बाळकृष्ण डेअरी फार्म (BKD मिल्क) ची स्थापना केली.त्यांनी पतीच्या पाठिंब्याने अशा एका फर्मची कल्पना केली जिथे गायी मुक्तपणे फिरू शकतील आणि त्यांना ५जी नेपियर गवत, गहू आणि बाजरी यांसारखा सेंद्रिय चारा दिला जाईल.
भेसळ आणि हानिकारक रसायनांपासून मुक्त A2 दूध तयार करणे हा ज्योती पद्मा यांचा उद्देश स्पष्ट होता. नैतिक आणि मानवीय शेती पद्धतींचा पुरस्कार करणाऱ्या ज्योती यांनी हाताने दूध काढण्याचं काम करतात. त्यानंतर दूध काही तासांत ग्राहकांच्या घरी पोहोचते.
काही शेतकरी गायीला २० रुपयांचे इंजेक्शन देतात, ज्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि गायीला ४८ तास सतत दूध देण्यास भाग पाडतात. हे दूध पिणाऱ्यांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो. बीकेडी मिल्कमध्ये ज्योती आपल्या गायींच्या आरोग्याला आणि दुधाच्या शुद्धतेला प्राधान्य देतात.
आज बीकेडी मिल्कची वार्षिक उलाढाल १ कोटीत आहे, ते दररोज २०० हून अधिक ग्राहकांना दूध पुरवतात. या प्रक्रियेत कोणतेही मशीन वापरले जात नाही असं ज्योती अभिमानाने सांगतात. बीकेडी मिल्कच्या यशानंतर ज्योतीने परीक्षित संपत साई यांच्या सहकार्याने ' काऊ करेन्सी' सुरू केले. या मॉडेल अंतर्गत लोक रोजची गायीची काळजी न घेताही तिचे मालक बनू शकतात.
काऊ करेन्सीत १,०८,००० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह ग्राहक तीन वर्षांसाठी गायीचे मालक बनतात. गायीची देखभाल, चारा आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी फार्म घेते. त्या बदल्यात ग्राहकांना दररोज त्यांच्या घरी दोन लिटर ताजे A2 दूध आणि दोन किलो तूप दर महिन्याला त्यांच्या घरी पोहोचवले जाते. एखादा ग्राहक दुसऱ्या राज्यात असेल तर त्याला कुरिअरद्वारे तूप पोहोचवले जाते आणि दुधाची किंमत त्याच्या खात्यात जमा केली जाते.