केवळ १० हजारांच्या SIP नं करोडपती; कमी कालावधीत कमाई करून देणाऱ्या ३ MF स्कीम कोणत्या, किती मिळाला रिटर्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:09 IST2025-01-06T08:42:20+5:302025-01-06T09:09:58+5:30
Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. हल्ली अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत.

Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. हल्ली अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत. यात जोखीम जरी अधिक असली तर मिळणारा परतावा जास्त असल्यानं याला लोकांची पसंती मिळत आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
म्युच्युअल फंड आपल्या भविष्यासाठी पैसे वाचविण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. जर आपण नियमित गुंतवणूक करू इच्छित असाल तर म्युच्युअल फंड आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही तुमच्या ध्येयानुसार वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्स निवडू शकता. लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरल आणि डिव्हिडंड यील्ड असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ते कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात यावर ते अवलंबून असतं.
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्यांचं बाजार भांडवल पाच हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असतं. या कंपन्यांमध्ये वाढीची चांगली शक्यता असते. त्यामुळे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड अधिक परतावा देऊ शकतात. परंतु, ते अधिक जोखमीचे देखील असतात. गेल्या काही काळात कोणत्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडानं चांगला परतावा दिलाय हे जाणून घेऊ.
कोटक स्मॉल कॅप फंड - कोटक स्मॉल कॅप फंड फेब्रुवारी २००५ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत यानं १८.२३ टक्के परतावा दिला आहे. जर कोणी १५ वर्षे दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी केली असती तर त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य आज १.०२ कोटी रुपये झालं असतं. यामध्ये तुमची गुंतवणूक केवळ १८ लाख रुपये असती.
एसबीआय स्मॉल कॅप फंड - एसबीआय स्मॉल कॅप फंड सप्टेंबर २००९ मध्ये सुरू करण्यात आला होता. यानं आतापर्यंत २०.७४ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही यात १५ वर्षांसाठी १० हजार रुपयांची मासिक एसआयपी केली तर तुमचा फंड १.२५ कोटी रुपयांपर्यंत वाढला असता. यात गुंतवलेली रक्कम केवळ १८ लाख रुपये असती.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड - निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड सप्टेंबर २०१० मध्ये सुरू करण्यात आला होता. यानं आतापर्यंत २२.२२ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही १५ वर्षांसाठी १०,००० रुपयांची मासिक एसआयपी केली तर तुमचा फंड वाढून १.२७ कोटी रुपये झाला असता. यात गुंतवलेली रक्कम केवळ १८ लाख रुपये असती.
स्मॉल कॅप म्युच्युअल फंड दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात, हे या तीन स्कीम्सच्या परताव्यावरून दिसून येतं. परंतु म्युच्युअल फंड स्कीम्सचा परतावा शेअर बाजारातील जोखमीवर अवलंबून असतो. त्यामुळे यात परताव्याची हमी देता येत नाही.
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)