धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:17 IST2025-04-16T12:12:58+5:302025-04-16T12:17:23+5:30

chennai super kings LIC : चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण, महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेने फक्त क्रिकेटप्रेमींचे मनोरंजनच नाही तर भारतीय जीवन विमा महामंडळाला मोठा नफा कमावून दिला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) राहिला आहे. या स्पर्धेत संघाने १२ वेळा प्लेऑफ आणि १० वेळा अंतिम फेरी गाठली आहे. शिवाय ५ वेळा विजेतेपदही जिंकले आहे. कारण, महेंद्रसिंह धोनीसारखा हुकमी एक्का या संघाकडे आहे.

सीएसकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. जिथे जिथे सीएसकेचा सामना असतो, ते मैदाना अक्षरशः पिवळे झालेले पाहायला मिळते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने केवळ क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले नाही तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळालाही मालामाल केलं आहे. आतापर्यंत एलआयसीने सीएसकेद्वारे सुमारे १००० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. पण, ही कमाई होती कशी?

चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी इंडिया सिमेंट्सकडे आहे. तर एलआयसीकडे इंडिया सिमेंट्सचे १.८ कोटी शेअर्स होते. त्यामुळे, एलआयसी देखील सीएसकेमध्ये भागधारक बनली. २०१४ मध्ये, आयपीएलने एक नवीन नियम लागू केला की फ्रँचायझी स्वतंत्र कंपन्या असतील.

यानंतर, सीएसकेचे चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड नावाच्या स्वतंत्र संस्थेत रूपांतर झाले. या बदलामुळे, एलआयसीला चेन्नई सुपर किंग्जमध्ये ६.०४% हिस्सा मिळाला. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडच्या अनलिस्टेड शेअर्सची किंमत प्रति शेअर ३१ रुपये होती.

२०२४ पर्यंत त्यांची किंमत १९०-१९५ रुपयांपर्यंत पोहोचली. २०२२ मध्ये एकेकाळी सीएसकेचा शेअर २२३ रुपयांपर्यंत पोहोचला होता. अशाप्रकारे, एलआयसीला सीएसकेमधील गुंतवणुकीवर ६ पट पर्यंत मोठा नफा मिळाला.

एलआयसीला हा कोट्यवधींचा नफा केवळ नशिबाने मिळालेला नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे संघाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली.

आर्थिक वर्ष २४ मध्ये सीएसकेचे केंद्रीय पूल उत्पन्न (प्रसारण आणि प्रायोजकत्वातून) १५०% वाढून ४७९ कोटी रुपये झाले. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष २३ मध्ये १४ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २४ मध्ये करपश्चात नफा (PAT) २०१ कोटी रुपयांपर्यंत वाढला. म्हणजे वर्षात १,३६५% ची मोठी वाढ आहे.

आयपीएलचे मीडिया हक्क मागील सायकलच्या तुलनेत ३ पट किमतीला विकले गेले. यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या तिजोरीतही भरपूर पैसा आला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदामुळे चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलचा सर्वात निष्ठावंत चाहता वर्ग मिळाला. मुथूट ग्रुपसारख्या मोठ्या ब्रँडच्या प्रायोजकत्वाचा सीएसकेला आणखी फायदा झाला.