LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ, काय आहेत नवे दर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:59 IST2025-03-01T08:40:50+5:302025-03-01T08:59:06+5:30
LPG Price 1 March 2025: आज म्हणजेच शनिवार १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. पाहा काय आहेत नवे दर.

LPG Price 1 March 2025: आज म्हणजेच शनिवार १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजीच्या (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) नव्या दरानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी मिळालेला दिलासा आज काढून घेण्यात आला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये.
आज हा सिलिंडर दिल्लीहून कोलकातापर्यंत ६ रुपयांनी महागला आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या मार्च महिन्यातील किमतीचा कल पाहिला तर १ मार्च रोजी झालेली वाढ ही गेल्या ५ वर्षांतील सर्वात कमी वाढ आहे. इंडियन ऑईल पोर्टलवरील आकडेवारीनुसार, मार्च २०२३ मध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती सर्वाधिक वाढल्या, जेव्हा एका झटक्यात किंमत ३५२ रुपयांनी वाढली होती.
अर्थसंकल्पाच्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत केवळ १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी ७ रुपयांची छोटीशी सवलत मिळाली होती. १ ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंडियन ऑईलनं जाहीर केलेल्या ताज्या दरानुसार, १ मार्चपासून दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १८०३ रुपये झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत १७९७ रुपये आणि जानेवारीत १८०४ रुपये होती. कोलकात्यात हाच व्यावसायिक सिलिंडर आता १९१३ रुपयांना मिळणार आहे. फेब्रुवारीत तो १९११ रुपयांवरून १९०७ रुपयांवर आणण्यात आला होता.
मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता पुन्हा १७५५.५० रुपये झाली आहे. फेब्रुवारीत ती १७४९.५० रुपये आणि जानेवारीत १७५६ रुपये होती. चेन्नईमध्येही याच्या किंमतीत वाढ झाली असून आता तो १९१८ रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर १ ऑगस्ट इतकाच आहे. आज, १ मार्च २०२५ रोजी तो ८०३ रुपयांना विकला जात आहे. तर लखनौमध्ये १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ८४०.५० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९१८ रुपये आहे. कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.