By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:32 IST
1 / 8LPG Cylinder Shortage: मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे देशात एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, सरकारनं स्पष्ट केलंय की भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून घाबरण्याची कोणतीही गरज नाही. देशात तेल आणि गॅसचा पुरवठा सातत्यानं सुरू असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.2 / 8पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. भारत आपली कच्च्या तेलाची गरज सुमारे ४० वेगवेगळ्या देशांकडून आयात करून पूर्ण करतो. यामुळे पुरवठ्यासाठी भारत केवळ एका क्षेत्रावर अवलंबून नाही, असं त्यांनी नमूद केलं.3 / 8भारताचा कच्च्या तेलाचा एकूण वापर सुमारे १८९ दशलक्ष मेट्रिक टन असून दररोज सुमारे ५५ लाख बॅरल तेलाची गरज भासते. सध्याच्या परिस्थितीतही तेलाचा पुरवठा सुरू असून, नुकतेच कच्च्या तेलाचे दोन कार्गो भारतासाठी रवाना झाले आहेत, असंही त्या म्हणाल्या.4 / 8सुजाता शर्मा यांनी सांगितलं की, ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने पुरवठ्याचे विविध मार्ग तयार केले आहेत. सध्या सुमारे ७० टक्के कच्चं तेल 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' व्यतिरिक्त इतर मार्गांनी भारतात पोहोचत आहे. यामुळे प्रादेशिक तणावाचा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर होणारा परिणाम कमी झाला आहे. 5 / 8घरगुती पीएनजी (PNG) आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजीचा (CNG) पुरवठा पूर्णपणे सामान्य आहे. जागतिक परिस्थितीमुळे काही पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी, देशातील अत्यावश्यक सेवांवर त्याचा प्रभाव पडू दिला जात नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.6 / 8एलपीजी सिलेंडरच्या टंचाईबाबत स्पष्टीकरण देताना सुजाता शर्मा म्हणाल्या की, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सिलेंडर बुकिंगनंतर सुमारे अडीच दिवसांच्या आत डिलिव्हरी सुनिश्चित केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जगासाठी हा आव्हानात्मक काळ असला तरी, भारतातील ऊर्जा पुरवठ्याची स्थिती सध्या स्थिर आणि नियंत्रणात आहे.7 / 8होर्मुज क्षेत्रात सध्या भारताची एकूण २८ जहाजे आहेत. त्यापैकी २४ जहाजे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'च्या पश्चिम भागात असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी तैनात आहेत. तर ४ जहाजे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'च्या पूर्व भागात असून त्यावर ११ भारतीय खलाशी उपस्थित आहेत.8 / 8 अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिल्यानंतर भारताने रशियाकडून सुमारे ३० दशलक्ष बॅरल कच्चं तेल खरेदी केलं आहे. या काळात, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनं स्पॉट मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या रशियन कच्च्या तेलाच्या बहुतेक न विकलेल्या कार्गो खरेदी केल्या. ट्रेडर्सनुसार, इंडियन ऑइलनं सुमारे १ कोटी बॅरल तेल खरेदी केलं, तर रिलायन्स इंडस्ट्रीजनेही तेवढ्याच प्रमाणात तेल खरेदी केलं.