LPG Cylinder Shortage: सरकार म्हणतं एलपीजी कमतरताच नाही, दुसरीकडे बाजारातून इंडक्शनही होताहेत गायब; नक्की चाललंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:31 IST2026-03-13T08:47:21+5:302026-03-13T09:31:51+5:30

LPG Cylinder Shortage: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतीयांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याच्या चिंतेमुळे लोकांनी आता इंडक्शन कुकटॉपकडे वळण्यास सुरुवात केली आहे, मात्र आता त्याचाही तुटवडा जाणवू लागलाय.

LPG Cylinder Shortage: मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतीयांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याच्या चिंतेमुळे लोकांनी आता इंडक्शन कुकटॉपकडे वळण्यास सुरुवात केली आहे, मात्र आता त्याचाही तुटवडा जाणवू लागलाय.

जवळपास सर्वच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि प्रत्यक्ष दुकानांमध्ये इंडक्शन कुकटॉप 'आउट ऑफ स्टॉक' झालेत. गेल्या काही दिवसांपासून युद्धाचा परिणाम भारतीय घराघरांपर्यंत पोहोचला असून, एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम झालाय. विशेष म्हणजे, सरकार वारंवार देशात एलपीजीची कोणतीही कमतरता नसल्याचा दावा करत असताना ही परिस्थिती ओढवली आहे.

देशभरातील अनेक विक्रेत्यांनी सांगितलं की, काळ्या बाजारात मोठी किंमत मोजूनही त्यांना एलपीजी सिलेंडर मिळत नाहीत. हे संकट किती काळ टिकेल याची कल्पना नसल्यामुळे लोक इंडक्शन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी इंडक्शन संपले आहेत आणि जिथे उपलब्ध आहेत, तिथे त्यांची किंमत ५९,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

भारतीय खाद्यपदार्थांचं दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की, "मी गेल्या ४ दिवसांपासून गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करत आहे, पण एजन्सी फोन उचलत नाहीये. हेल्पलाइन नंबरही काम करत नाहीत. जर एलपीजीची अडचण नाहीये, तर आम्हाला हा त्रास का सहन करावा लागतोय? सिलेंडर मिळाला नाही तर दुकान बंद करावं लागेल."

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, देशात एलपीजी, पेट्रोल, डिझेल किंवा केरोसीनची कोणतीही कमतरता नाही. पुरी यांनी माहिती दिली की, एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ झाली असून, देशातील कोट्यवधी कुटुंबांना गॅसची कमतरता भासू नये हे सरकारचं प्राधान्य आहे. मात्र, जमिनीवरील परिस्थिती सरकारच्या या दाव्याच्या अगदी उलट असल्याचं चित्र आहे.

भारत आपल्या एलपीजी गरजेपैकी साधारण ६० टक्के आयात करतो. यातील बहुतांश म्हणजे ८०-९० टक्के पुरवठा कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया आणि कुवैत यांसारख्या मध्य पूर्वेतील देशांमधून येतो.

ताज्या संकटामुळे पुरवठा साखळीवर मोठा दबाव आला आहे. आखाती देशांमधून येणारे बहुतांश एलपीजी शिपमेंट 'होर्मुज स्ट्रेट'मधून जातात. वाढत्या तणावामुळे हा मार्ग सध्या अनिश्चिततेने भरलेला आहे. युद्धाच्या धोक्यामुळे वाढलेला विम्याचा खर्च, जहाजांचे बदललेले मार्ग आणि प्रवासासाठी लागणारा जास्त वेळ, या सर्व कारणांमुळे पुरवठा कमी झाला असून किमती वाढत आहेत.