केवळ IIT नाहीये यशाचा एकमेव मार्ग, पीयूष बन्सल यांच्यासह 'या' लोकांनी केलंय सिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 18:49 IST2022-02-05T18:36:21+5:302022-02-05T18:49:02+5:30
काही दिग्गज व्यक्तींनी आयआयटीच यशाचा एकमेव मार्ग नसल्याचं दाखवून दिलंय. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती.

भारतात दरवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थी IIT JEE साठी बसतात. मर्यादित जागांसह, प्रत्येक उमेदवाराला आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. काही विद्यार्थी यामुळे निराशही होतात, परंतु खालील दिग्गज व्यक्तींनी आयआयटीच यशाचा एकमेव मार्ग नसल्याचं दाखवून दिलंय. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती.
पीयूष बन्सल, सह-संस्थापक आणि सीईओ, लेन्सकार्ट
पीयूष बन्सल यांनी आयआयटी जेईईच्या परीक्षेला बसले होते. पण त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. ते लेन्सकार्टचे सह-संस्थापक आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे.
नारायण मूर्ती, संस्थापक इन्फोसिस
नारायण मूर्ती यांनी आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही केली. परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांना ते परवडत नसल्याने ते प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यांनी म्हैसूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. त्यांनी 1981 मध्ये कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना पुन्हा Infosys ची सुरुवात केली आणि आज त्यांची एकूण संपत्ती 4.4 अब्ज डॉलर्स इतकी आहे. परंतु त्यांनी आयआयटी कानपूरमधून पदव्युत्तर पदवी घेऊन आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.
सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ
मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेलादेखील कधी आयआयटीमध्ये गेले नाहीत. त्यांनी कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिीकल इंजिनीअरिंगमध्ये बी-टेक केले.
शाश्वत नाकराणी, सह-संस्थापक भारतपे
शाश्वत नाकराणी शार्क टँक इंडियाचे जज आणि भारतपे चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्यासह भारतपेचे सह-संस्थापक आहेत. त्यानं यापूर्वी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. परंतु 2018 मध्ये तो बाहेर पडला. 2021 मध्ये आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये त्याला 'यंगेस्ट रिचेस्ट सेल्फ मेड' व्यक्ती म्हणून त्याचं नाव आलं.
अझहर इक्बाल, सह-संस्थापक आणि सीईओ इनशॉर्ट्स
अझहर इक्बाल हा न्यूज अॅप इनशॉर्ट्सचा सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तो IIT दिल्ली येथे मॅथेमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत होता. पण 2012 मध्ये त्याने Inshorts अॅपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षण सोडले.
वेंकटरामन रामकृष्णन | नोबेल पारितोषिक, रसायनशास्त्र 2009
वेंकटरामन रामकृष्णन आयआयटी प्रवेश परीक्षा पास करू शकले नाहीत. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना 2009 मध्ये "राइबोसोमच्या रचना आणि कार्याच्या अभ्यासासाठी" रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. 2010 मध्ये त्यांना भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मविभूषण पुरस्कार देखील मिळाला.
देशातील या नामवंत व्यक्तींनी आयआयटी हा यशाचा एकमेव मार्ग नाही हे सिद्ध केलेय. तुम्ही IIT JEE क्रॅक करू शकला नसला तरीही तुम्ही आयुष्यात मोठे होऊ शकता. तसंच जर तुमचे आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न असेल, तर नारायण मूर्ती यांच्याप्रमाणे तुम्ही पदवृत्तर शिक्षणासाठी प्रयत्न करूच शकता.