Retirement Planning साठी उशीर झालाय? ४० व्या वर्षीही करू शकता प्लॅन, वृद्धापकाळात मिळेल महिन्याला १ लाखाचं पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 08:52 IST2025-01-14T08:41:24+5:302025-01-14T08:52:21+5:30

निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षांनंतर नोकरी मिळणार नाही, मग आपला खर्च कसा भागवायचा? यामुळेच लोक निवृत्तीचं नियोजन करतात. पण तुम्हाला उशीर झाला असेल तर जास्त विचार करायची गरज नाही.

Retirement Planning : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असतेच. हल्ली अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळत आहेत. त्यातच पारंपारिक गुंतवणूकीसोबत गुंतवणूकीसाठी आणखी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या भविष्यातील आर्थिक चिंता दूर करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला आपल्या मेहनतीचा पैसा विचारपूर्वक गुंतवणं आवश्यक आहे.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्याचीही चिंता सतावत असेल. अनेकदा मनात येतं की, निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षांनंतर नोकरी मिळणार नाही, मग आपला खर्च कसा भागवायचा? यामुळेच लोक निवृत्तीचं नियोजन करतात. काही लोक निवृत्तीचं प्लॅनिंग खूप लवकर करू लागतात, पण काही लोकांना प्लॅनिंग करायला उशीर होतो.

त्यासाठी आपल्याला किती पैशांची गरज आहे आणि पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार करावा लागेल. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी उत्तम पर्याय म्हणजे एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टीम), जेणेकरून थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळेल. चला तर मग जाणून घेऊया जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला दरमहा किती पैसे गुंतवावे लागतील, जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर जवळपास १ लाख रुपये पेन्शन मिळू शकेल.

समजा तुम्हाला निवृत्तीच्या वेळी म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी १ लाख रुपये पेन्शन घ्यायची आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ४० वर्षांचे असाल तरी फार उशीर झालेला नाही. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत जमा झालेल्या सर्व पैशांमधून जर तुम्ही अॅन्युइटी प्लॅन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पेन्शन मिळू शकेल, तर त्यावेळी तुम्हाला जवळपास १.८५ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. या पैशांवर तुम्हाला वार्षिक ७ टक्के दरानं व्याज मिळेल, असं मानलं जात आहे.

१.८५ कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे १२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत ही दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ करावी लागते. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सुमारे १० टक्के वार्षिक परतावा मिळाला तर पुढील २० वर्षांत म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत तुमच्याकडे १.८५ कोटी रुपयांचा निधी असेल.

आता समजा तुम्ही तुमचे सर्व पैसे पेन्शनसाठी वापरण्यासाठी अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवले. अॅन्युइटी प्लॅनमध्ये तुम्हाला सरासरी ७% परतावा मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा सुमारे १.०७ लाख रुपये पेन्शन मिळेल.