Royal Challengers Bengaluru: टीम RCB विकली जाणार, कोण खरेदी करणार? २०२६ च्या लिलावापूर्वी मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:56 IST2025-11-06T08:43:23+5:302025-11-06T08:56:34+5:30

डिआजियो या कंपनीची भारतीय युनिट असलेली युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, सध्या त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या आयपीएल आणि डब्ल्यूपीएल क्रिकेट संघाचा आढावा घेत आहेत. पाहा काय आहे त्यांचा प्लॅन.

IPL Team RCB: डिआजियो (Diageo) या कंपनीची भारतीय युनिट असलेली युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL), सध्या त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) या आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) क्रिकेट संघाचा आढावा घेत आहेत. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडनं जाहीर केलंय की, ते त्यांच्या १००% मालकीच्या उपकंपनी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (RCSPL) गुंतवणुकीचे धोरणात्मक पुनरावलोकन (Strategic Review) सुरू करत आहेत.

मिंटच्या वृत्तानुसार, आढावा घेण्याच्या या प्रक्रियेत कंपनी आरसीबी संघाची विक्री करू शकते, कारण हा संघ युनायटेड स्पिरिट्सच्या नॉन कोअर रेव्हेन्यूचा (Non-Core Revenue) भाग आहे. ही कंपनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची मालक आहे, जे इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि विमेन्स प्रीमियर लीग (WPL) मध्ये सहभागी होतात.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ही पुनरावलोकन प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. युनायटेड स्पिरिट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रवीण सोमेश्वर यांनी सांगितलं की, सर्व भागधारकांसाठी दीर्घकाळ मूल्य सुनिश्चित करण्यासाठी कंपनी आता भारतात त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजेच मद्य उत्पादनावर लक्ष केंद्रित करू इच्छिते.

आरसीएसएल (RCSPL) ही कंपनीसाठी एक मौल्यवान मालमत्ता आहे, परंतु तो कंपनीच्या मुख्य व्यवसायाचा भाग नाही. त्यामुळे, हे पाऊल कंपनीच्या पोर्टफोलिओला अधिक सुव्यवस्थित (Streamlined) करण्याच्या दिशेनं असल्याचंही सोमेश्वर म्हणाले.

मिंटच्या रिपोर्टनुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पूनावाला आरसीबी संघ खरेदी करण्याची योजना आखत आहेत. या संभाव्य कराराची किंमत १ ते १.२ अब्ज अमेरिकन डॉलर (अंदाजे १०,६०० कोटी रुपये) इतकी सांगितली जात आहे, जी संघाच्या महसुलाच्या सुमारे २० पट आहे.

दुसरीकडे, सीएनबीसी-टीव्ही१८ (CNBC-TV18) च्या रिपोर्टनुसार, पूनावाला यांना संपूर्ण आरसीबी फ्रँचायझी (Franchise) खरेदी करायची आहे. त्यांना त्यातील काही प्रमाणात हिस्सा खरेदी करण्यात रस नसल्याचंही समोर येत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात आरसीबीचं उत्पन्न २१ टक्क्यांनी घसरून ५०४ कोटी रुपये झालं होतं. तर, नफा ३६ टक्क्यांनी घसरून १४० कोटी रुपयांवर आला होता. हे उत्पन्न युनायटेड स्पिरिट्सच्या एकूण उत्पन्नाचा अंदाजे ९ टक्के हिस्स्याइतके आहे.