पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा

By जयदीप दाभोळकर | Updated: July 14, 2025 09:50 IST2025-07-14T09:37:57+5:302025-07-14T09:50:17+5:30

अनेकदा गुंतवणूकदार आपल्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा काढून घेण्याऐवजी त्याच किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीत पुन्हा गुंतवणूक करतात. या पद्धतीमुळे 'कंपाउंडिंग पॉवर'नं कालांतरानं संपत्ती झपाट्यानं वाढण्यास मदत होते.

अनेकदा गुंतवणूकदार आपल्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा काढून घेण्याऐवजी त्याच किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीत पुन्हा गुंतवणूक करतात. या पद्धतीमुळे 'कंपाउंडिंग पॉवर'नं कालांतरानं संपत्ती झपाट्यानं वाढण्यास मदत होते. जर तुम्हीही तुमचा परतावा पुन्हा गुंतवण्याचा विचार करत असाल तर अनेक चांगल्या आणि कमी जोखमीच्या गुंतवणुकीच्या योजनांचा विचार करू शकता.

पीपीएफसारख्या योजनांपासून ते बँक एफडीपर्यंत या योजनांना सरकारचं पाठबळ असल्यानं गुंतवणुकीसाठी कमी जोखीम मानली जाते. शिवाय, ते केवळ टिकाऊ आणि कमी जोखमीचे पर्याय नाहीत तर आर्थिक सुरक्षेशी तडजोड न करता सातत्यपूर्ण परतावा देखील देतात. आपण आज सुरक्षित पर्यायांबद्दल जाणून घेऊ.

मुदत ठेवी, ज्याला एफडी देखील म्हणतात, आपल्या परताव्याची पुनर्गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. अनेक बँका इतर कमी जोखमीच्या पर्यायांपेक्षा ठराविक कालावधीसाठी चांगले व्याजदर देत असल्यानं अनेक वर्षांपासून हा भारतातील गुंतवणुकीचा प्राधान्याचा पर्याय आहे. याव्यतिरिक्त, एफडीमध्ये लवचिकता, कलम ८० सी अंतर्गत ५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी कर लाभ, उच्च स्थिरता आणि नियमित व्याज इत्यादी इतर अनेक फायदे देखील दिले जातात.

सोन्याचे दागिने, नाण्यांपासून व्हर्च्युअल गोल्डपर्यंत अजूनही गुंतवणूकदार हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानतात, कारण सोन्याची किंमत एका दिवसात फारशी घसरत नाही. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या व्याजातूनही पैसे कमावले जातात.

२००४ मध्ये सुरू झालेली ही सरकार पुरस्कृत ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही १,००० रुपयांपासून ३० लाख रुपयांपर्यंत ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता आणि ८.२ टक्के निश्चित व्याज दर मिळवू शकता.

कमी जोखमीच्या गुंतवणुकीच्या योजनांसाठी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम सर्वोत्तम मानली जाते. ही एक सुरक्षित, सरकार समर्थित मासिक उत्पन्न योजना आहे जी किमान १,००० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू करता येते. एकाच नावानं कमीत कमी ५ वर्षे गुंतवणूक केल्यास ती ९ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. जॉइंट अकाऊंटअंतर्गत तुम्ही १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

पीपीएफ ही भारतातील आणखी एक कमी जोखमीची गुंतवणूक योजना मानली जात आहे. १५ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह, पीपीएफ ही सरकार समर्थित गुंतवणूक योजना आहे जी गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानली जाते. शिवाय, ही योजना सामान्य दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टापेक्षा जास्त व्याज दर देऊ शकते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)