भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:49 IST2025-10-14T12:40:36+5:302025-10-14T12:49:26+5:30
दुबईची बँक एमिरेट्स एनबीडी ₹15,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. RBI ची तत्त्वतः मंजुरी मिळाल्याने बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ. वाचा संपूर्ण डीलचे तपशील.

भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठी घडामोड होणार आहे. दुबईची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी ही भारतातील आरबीएल ही बँक विकत घेण्याच्या तयारीत आहे.
यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये गुंतविणार असून याद्वारे आरबीएलचे ५१ टक्के समभाग विकत घेणार आहे. ही डील झाल्यास बँकिंग क्षेत्रातील अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे.
सूत्रांनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने या गुंतवणुकीसाठी आणि बँकेच्या व्यवस्थापनामध्ये बदलासाठी तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
या गुंतवणुकीमुळे एमिरेट्स एनबीडी बँकेचा आशियातील विस्तार होईल. याशिवाय, भारत आणि पश्चिम आशिया दरम्यान असलेल्या वाढत्या 'रेमिटन्स' बाजारपेठेत (पैसे पाठवण्याचा व्यवसाय) त्यांची पकड मजबूत होईल.
भारतीय स्थलांतरितांपैकी जवळपास अर्धे लोक आखाती देशांमध्ये राहतात, त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
गुंतवणुकीचे स्वरूप
ही गुंतवणूक मुख्यतः प्रेफरेंशियल अलॉटमेंटद्वारे केली जाईल, ज्यात शेअर्स आणि वॉरंटचा समावेश असेल. यानंतर, अतिरिक्त 26% शेअर्ससाठी ओपन ऑफर आणली जाईल, ज्यामुळे एमिरेट्स एनबीडीचा एकूण हिस्सा 51% पर्यंत वाढेल.
RBL बँकेची बोर्ड मीटिंग १८ ऑक्टोबरला होणार असून, त्यात या तिमाहीच्या निकालांवर चर्चा केली जाईल. या भेटीतच या गुंतवणुकीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
एमिरेट्स एनबीडी बँक ही मध्य-पूर्व आशियातील सर्वात मोठी बँकिंग समूहांपैकी एक आहे, ज्यांचे जागतिक स्तरावर मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे या बँकेची भारतीय बाजारपेठेत एन्ट्री ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.
या वृत्तानंतर RBL बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या RBL बँकेचे बाजार भांडवल (market cap) सुमारे ₹17,786 कोटी आहे.
सध्या दोन्ही बँकांकडून या वृत्तावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु, या गुंतवणुकीची चर्चा बँकिंग आणि आर्थिक वर्तुळात जोरदार सुरू आहे.