शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुड न्यूज! आता 'जनरल' प्रवासही होणार ठंडा ठंडा, कूल कूल; रेल्वेची भन्नाट योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 12:28 PM

1 / 10
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी आणि सुविधेसाठी अनेकविध योजना, कार्यक्रम, बदल केले जात आहेत. वातानुकूलित श्रेणीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने अनेक मार्गांवर विशेष एसी ट्रेन सुरू केल्या आहेत.
2 / 10
एवढेच नव्हे, तर भारतीय रेल्वेकडून आता इकॉनॉमी एसी थ्री टायर नामक नवीन श्रेणीवर काम सुरू करण्यात आले असून, कमी किमतीत एसी प्रवासाचा (Rail Journey) आनंद प्रवासी घेऊ शकणार आहेत.
3 / 10
इकॉनॉमी एसी थ्री टायर कोचची निर्मिती सुरू असताना आता विनारक्षित सेकंड क्लास म्हणजेच जनरल डबे वातानुकूलित करण्याची योजना भारतीय रेल्वेकडून आखली जात आहे. यासह जनरल कोचेसमध्ये रेल्वे आणखी काही बदल करत असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असे सांगितले जात आहे.
4 / 10
भारतीय रेल्वेच्या कापूरथला रेल कोच फॅक्टरीमध्ये या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. सामान्य प्रवाशांसाठी ही योजना सुखद ठरून यामुळे रेल्वे प्रवासाचा अनुभवच बदलून जाईल, असा विश्वास रेल कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक रविंदर गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
5 / 10
नवीन योजनेमुळे जनरल डब्यातील प्रवास अधिक आरामदायी होईल. यामुळे प्रवाशांना एक वेगळाच अनुभव घेता येईल. वातानुकूलित जनरल डब्यांचे अभिकल्प (डिझाइन) निश्चित करण्यात आले आहे, असेही सांगितले जात आहे.
6 / 10
काही दिवसांत एसी जनरल डब्यांच्या निर्मितीला सुरुवात केली जाणार असून, या वर्षअखेरपर्यंत वातानुकूलित विनारक्षित जनरल डबे रुळांवरून धावू लागतील, असे सांगितले जात आहे. आताच्या घडीला जनरल डब्यातील प्रवास सुखकर करण्यासाठी दीनदयालू कोच सेवेत आहेत.
7 / 10
सध्या रेल्वे सेवेत असलेल्या जनरल डब्यांची प्रवासी क्षमता १०० होती. एका कोचच्या निर्मितीसाठी रेल्वेला २.२४ कोटी रुपयांचा खर्च येत आहे. नवीन एसी जनरल कोचमध्ये प्रवासी क्षमता वाढवण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक सोयी, सुविधाही यामध्ये देण्यात येणार आहेत.
8 / 10
लांब पल्ल्यांच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये हे नवीन एसी जनरल कोच लावले जाणार असून, १३० कि.मी. प्रति तास वेगाने ते धावू शकणार आहेत. नॉन एसी जनरल कोचेस ११० कि.मी. प्रति तासापेक्षा अधिक वेगाने धावू शकत नाहीत.
9 / 10
नवीन एसी जनरल कोचेस एलएचबी प्रकारातील असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिक वेगाने जाण्यासाठी यात काही बदल करण्यात येणार आहेत. दुसरीकडे इकॉनॉमी एसी कोचची वेगक्षमता १८० कि.मी. प्रति तास करण्यात आली असून, सन २०२२ पर्यंत २४८ डबे तयार करण्याची योजना रेल्वेकडून आखण्यात आली आहे.
10 / 10
सन २०१६ मध्ये भारतीय रेल्वेकडून दीनदयालू कोचचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच सर्वच्या सर्व जनरल डबे असलेली अंत्योदय एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. एलएचबी प्रकारातील अत्याधुनिक सोयी, सुविधा असलेल्या जनरल डब्यांमुळे प्रवासाचा अनुभव चांगला करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात आला होता.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स