India-US Trade: भारत- अमेरिका करारामुळे कोणत्या क्षेत्रांना किती फायदा होणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:42 IST2026-02-04T12:31:59+5:302026-02-04T12:42:38+5:30

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील रत्ने व अलंकार (जेम्स अँड ज्वेलरी) क्षेत्रासह चामडे, पादत्राणे, पोलाद, रसायने, सागरी उत्पादने, कृषी उत्पादने आणि फर्निचर यांसारख्या असंख्य क्षेत्रांना नवसंजीवनी मिळणार असून, देशाच्या निर्यातीत मोठी वाढ होणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने टैरिफ वाढवल्यामुळे ही सगळीच क्षेत्रे संकटात सापडली होती. निर्यात शुल्क ५०-५५ टक्क्यांपर्यंत गेले होते. मात्र, आता या करारामुळे खेळते भांडवल आणि नफ्याचे प्रमाण सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

रत्ने व अलंकार: अमेरिकी भारतीय दागिन्यांची मागणी, स्पर्धात्मकता वाढेल. याचा फायदा छोटवा आणि मध्यम दागिना उत्पादकांना होईल. कच्चे हिरे व रंगीत रत्नांना लाभ मिळेल.

तयार कपडे: भारतीय कापड उद्योग जादा शुल्कामुळे अडचणीत आला होता. या करारामुळे या उद्योगास नवीन ऊर्जा मिळाली असून, येणाऱ्या काळात निर्यातीत मोठी वाढ होईल.

वाहन सुटे भाग: शुल्कात कपातीमुळे भारतात उत्पादित वाहन सुटे भाग अमेरिकी बाजारपेठेत स्वस्त होतील. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान मजबूत होईल.

रसायने : भारतातून सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने, रंगद्रव्ये, कृषी रसायने, औषध निर्मितीसाठी लागणारे घटक अमेरिकेला निर्यात होतात. शुल्क कमी झाल्यामुळे त्यांना लाभ होईल.

फर्निचर : भारतातून लाकडी फर्निचर, हस्तकलेच्या वस्तू, घराच्या सजावटीच्या वस्तू, लोखंडी कपाटे अशा वस्तूंची निर्यात अमेरिकेला होते. कारागिर, निर्यातदारांना याचा लाभ होईल.

कृषी उत्पादने, मसाले: मसाले, तांदूळ, तेलबिया, फळे आणि भाजीपाला निर्यात होतो. करारामुळे या निर्यातीला चालना मिळून शेत मालास भाव मिळण्यास मदत होणार आहे.

यंत्रसामग्री: भारतीय यंत्रसामग्री आणि उपकरणांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. कराराने भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल.