FD Investment Tips : FD करायच्या विचारात असाल तर पत्नीच्या नावे करा गुंतवणूक; २ लाखांवर ₹३२,०४४ व्याजच मिळेल

By जयदीप दाभोळकर | Updated: March 21, 2025 08:59 IST2025-03-21T08:48:20+5:302025-03-21T08:59:49+5:30

FD Investment Tips : जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एफडी करण्याचा विचार करत असाल तर ती रक्कम स्वत:च्या नावावर गुंतवण्याऐवजी ती तुमच्या पत्नी, आई किंवा मुलीच्या नावावर गुंतवण्याचा विचार करू शकता.

Investment Tips: भविष्याच्या दृष्टीनं अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एफडी करण्याचा विचार करत असाल तर ती रक्कम स्वत:च्या नावावर गुंतवण्याऐवजी ती तुमच्या पत्नी, आई किंवा मुलीच्या नावावर गुंतवण्याचा विचार करू शकता.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate-MSSC) ही महिलांसाठी सरकारद्वारे चालविली जाणारी एकरकमी ठेव योजना आहे. या योजनेत २ वर्षांसाठी रक्कम गुंतवता येते आणि त्या गुंतवणुकीवर तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळू शकते. या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.

जर तुम्ही या योजनेत दोन वर्षांसाठी २,००,००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त व्याजातून ३२,०४४ रुपये मिळतील. परंतु सरकारनं सध्या या योजनेची मुदत वाढवली नसल्यानं तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी ३१ मार्चपर्यंतच मिळणार आहे. एमएसएससी कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला १,००,०००, १,५०,००० आणि २,००,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल ते जाणून घेऊया.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कॅल्क्युलेटर २०२५ नुसार या योजनेत १,००,००० रुपये गुंतवल्यास तुम्हाला ७.५% व्याजदरानं मुदतपूर्तीच्या वेळी १,१६,०२२ रुपये मिळतील आणि व्याजापोटी १६,०२२ रुपये मिळतील. जर तुम्ही १,५०,००० रुपये जमा केले तर तुम्हाला दोन वर्षांनंतर १,७४,०३३ रुपये मिळतील.

अशा परिस्थितीत व्याजातून २४,०३३ रुपये मिळतील. जर तुम्ही २,००,००० रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानुसार दोन वर्षांनंतर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील.

जर तुम्हालाही तुमच्या घरातील महिलेच्या नावानं या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचं खातं उघडावं लागेल. खातं उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नसून कोणत्याही वयोगटातील मुलगी किंवा महिला या योजनेत गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीच्या नावानं पालक खातं उघडू शकता.

नियमानुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना २ वर्षात मॅच्युअर होते, परंतु आपल्याला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंशत: पैसे काढण्याची सुविधा मिळते. गरज पडल्यास १ वर्षानंतर ४० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. समजा तुम्ही या योजनेत २ लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.