८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:29 IST2025-12-23T10:20:24+5:302025-12-23T10:29:22+5:30

Senior Citizen Savings Scheme : निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वावलंबी असावे, असे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वाटते. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची 'वरिष्ठ नागरिक बचत योजना' हा एक सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

केंद्र सरकारची हमी असलेल्या या योजनेत सध्या ८.२ टक्के इतका मोठा व्याजदर मिळत असून, गुंतवणुकीवर पूर्णतः सुरक्षा मिळते.

या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मिळणारे व्याज. जर तुम्ही या खात्यात ८,००,००० रुपये एकरकमी जमा केले, तर ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ३,२८,००० रुपये केवळ व्याज म्हणून मिळतील. म्हणजेच ५ वर्षांनंतर तुमच्या हातात एकूण ११,२८,००० रुपये असतील.

ज्यांना घराच्या खर्चासाठी दरमहा किंवा ठराविक कालावधीने पैसे हवे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. ८ लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दर तीन महिन्याला १६,४०० रुपये व्याज मिळू शकते.

या योजनेत किमान १,००० रुपये आणि कमाल ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेचा मूळ कालावधी ५ वर्षांचा आहे. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा ३ वर्षांसाठी वाढवता येतो. १ एप्रिल २०२३ पासून ८.२% वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. व्याजाची गणना दर तीन महिन्यांनी केली जाते.

खात्यात वारसदार नियुक्त करण्याची आणि गरज पडल्यास बदलण्याची सोय आहे. पती-पत्नी एकत्र किंवा स्वतंत्र खाते उघडू शकतात.

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेला कोणताही सामान्य नागरिक या योजनेत खातं उघडू शकतो. तसेच ५५ ते ६० वर्षांच्या दरम्यान ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती किंवा सुपरएन्युएशन घेतले आहे. संरक्षण दलातील निवृत्त कर्मचारी ५० वर्षे वय पूर्ण झाल्यावरही हे खाते उघडू शकतात.

जर तुम्ही तिमाही मिळणारे व्याज वेळेवर काढले नाही, तर त्यावर पुन्हा जादा व्याज मिळत नाही. त्यामुळे नियमित व्याज काढून घेणे फायदेशीर ठरते. ही योजना सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक 'पॉवरफुल' पर्याय आहे.