बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:08 IST2025-05-08T11:06:12+5:302025-05-08T11:08:25+5:30
how safe is your money in banks : जर एखादी बँक बुडाली आणि तुमचे त्या बँकेतील खात्यात पैसे असतील तर विमा म्हणून तुम्हाला काही रक्कम मिळते. पण, त्यापेक्षा जास्त ठेव तुमची बँकेत असेल तर तुमचे नुकसान निश्चितच होईल.

महाराष्ट्रात सरकारी आणि खासगी बँकांचं मोठं जाळं उभं राहिलं आहे. यात राष्ट्रीय बँकांपासून पतपेढ्या, सहकारी बँका ते खासगी बँकांपर्यंतचा समावेश आहे. पण, अलीकडच्या काळात बँकांतील गैरकारभाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर आरबीआयने पीएमसी बँक, येस बँक, इंडसइंड बँक आणि नंतर न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्रवर कठोर कारवाई केली. यातून, येस बँक आणि इंडसइंड बँक बुडण्यापासून वाचवण्यात सरकार आणि रिझर्व्ह बँकेने मोठे योगदान दिले आहे.
तर पीएमसी बँकेत सध्या चौकशी सुरू असताना, दुसरीकडे, आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे बोर्ड बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. अशा परिस्थितीत जर बँक बुडाली तर तुमच्या पैशांचं काय होतं?
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सरकारी बँकांच्या यादीत सर्वात सुरक्षित आहे. एसबीआयच्या देशात आणि परदेशात १० हजारांहून अधिक शाखा आहेत.
खाजगी बँकांबद्दल बोललो तर, आरबीआय एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांना सर्वात सुरक्षित मानते. या बँकांच्या व्यवसायाचा आकार, निधी, शाखांची संख्या आणि ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांनुसार, त्या देशातील सर्वात सुरक्षित बँका मानल्या जाऊ शकतात.
जर एखादी बँक बुडाली आणि तुम्ही त्यात लाखो आणि कोट्यवधी रुपये जमा केले तर तुमचे नुकसान निश्चितच होईल. कारण आरबीआयच्या नियमांनुसार, बँक बुडाल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त ५ लाख रुपयेच दिले जातात. उदाहरणार्थ, समजा तुम्ही बँकेत १० लाख रुपये जमा केले आहेत आणि ती बँक बुडाली, तर तुम्हाला विमा म्हणून फक्त ५ लाख रुपये मिळतील.