एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:33 PM2020-02-25T17:33:00+5:302021-09-30T19:29:17+5:30

धीरूभाई अंबानी यांनी ४७ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७३ मध्ये रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती.

धीरूभाई अंबानी यांनी सुरू केलेली 'रिलायन्स इंडस्ट्रीज' ही आज देशातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि तिचे मालक मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

पेट्रोलियम, ऊर्जा, नैसर्गिक वायू, टेक्सटाईल्स, टेलिकॉम, रिटेल, मीडिया अशा सर्व प्रांतात रिलायन्सने आपले पाय भक्कम रोवले आहेत. फक्त भारतातच नव्हे, तर रिलायन्स समूहाने जगभरात आपलं जाळं विणलं आहे.

धीरूभाई अंबानी यांनी ४७ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७३ मध्ये रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती.

रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचं नामकरण १९८५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असं करण्यात आलं होतं. टेक्सटाईलसोबतच अन्य क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकलं होतं. त्यानंतर, या उद्योगसमूहानं मागे वळून पाहिलेलं नाही.

२००१ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या सगळ्यात मोठ्या कंपन्या बनल्या.

त्यानंतर २००६ मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी वेगळे झाले, पण रिलायन्सचा दबदबा अजूनही कायम आहे.

आज रिलायन्सच्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी काम करत आहेत आणि उद्योगसमूहाची उलाढाल ६ लाख २२ हजार ८०९ कोटी रुपयांच्या घरात आहे.

स्वाभाविकच, धीरूभाईंनी लावलेलं हे रोप आणि मुकेश अंबानींनी केलेला त्याचा वटवृक्ष ही नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी गोष्टच आहे. उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आजच्या तरुणांना मुकेश अंबानींनी बळ दिलं.

भारतात व्यवसाय किंवा उद्योग सुरू केलेल्या प्रत्येक तरुणामध्ये धीरूभाई किंवा बिल गेट्स होण्याची क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी एका समिटमध्ये व्यक्त केला होता.

धीरूभाईंनी रिलायन्सची सुरुवात केली तेव्हा एक टेबल, एक खुर्ची आणि १ हजार रुपये एवढंच भांडवल त्यांच्याकडे होतं, असं स्वतः मुकेश अंबानींनीच सांगितलं. अर्थात, तेव्हा १ हजार रुपये हीसुद्धा मोठीच रक्कम होती, पण त्यापेक्षा इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी अधिक मोठी होती. Where there's a will there's a way हे धीरूभाईंनी सिद्ध करून दाखवलं.

स्टार्ट-अप ही संकल्पना तेव्हा नव्हती, पण रिलायन्स हे एकप्रकारे स्टार्ट-अपच होतं आणि आज ती मोठी कंपनी झाली आहे. हे स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता भारतीय तरुणांमध्ये आहे, असा विश्वासही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.