Rohit Sharma : रोहित शर्मानं भाड्यानं दिला आपला फ्लॅट, महिन्याला किती मिळणार रेंट, काय आहे खास? डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:01 IST2025-02-28T08:52:23+5:302025-02-28T09:01:55+5:30

Rohit Sharma House News: हिटमॅन रोहित शर्मा जसा मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो, तसं त्याची पर्सनल लाईफही चर्चेत असतं. यावेळी तो त्याच्या घरामुळे तो चर्चेत आला आहे.

Rohit Sharma House News: हिटमॅन रोहित शर्मा जसा मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो, तसं त्याची पर्सनल लाईफही चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा चर्चेत आलाय. यावेळी त्याच्या घरामुळे तो चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं मुंबईतील लोअर परळमधील आपला एक फ्लॅट भाड्यानं दिला आहे.

जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या करारानुसार त्याला दरमहा २.६ लाख रुपये भाडं मिळणार आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे. ही कागदपत्रं स्क्वेअर यार्डनं पाहिली आहेत. रोहित शर्मानं मार्च २०१३ मध्ये वडील गुरुनाथ शर्मा यांच्यासोबत हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यावेळी त्याची किंमत ५.४६ कोटी रुपये होती.

स्क्वेअर यार्ड्सच्या म्हणण्यानुसार, ही मालमत्ता सध्याच्या भाड्यावर ६ टक्क्याचं रेंटल यील्ड देते. लोअर परळ हे मुंबईचे प्रमुख निवासी आणि व्यापारी केंद्र आहे. येथून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि नरिमन पॉईंट सारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक भागात सहज पोहोचता येतं.

रोहित शर्माचा फ्लॅट लोढा मार्किस - द पार्क मध्ये आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचा (लोढा ग्रुप) हा लक्झरी निवासी प्रकल्प असून तो ७ एकरात पसरलेला आहे. आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रेकॉर्डनुसार, या फ्लॅटचा कार्पेट एरिया १,२९८ स्क्वेअर फूट आहे. यात दोन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे.

या लीज ट्रान्झॅक्शनवर १६ हजार ३०० रुपये मुद्रांक शुल्क व एक हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. याच कॉम्प्लेक्समध्ये रोहित आणि त्याच्या वडिलांचा आणखी एक फ्लॅट आहे. २०१३ मध्ये त्याने ५.७० कोटी रुपयांना ते विकत घेतला होता. ऑक्टोबर २०२४ पासून हा फ्लॅट दरमहा २.६५ लाख रुपये भाड्यानं देण्यात आलाय.

रोहित शर्माचा लोअर परळमधील फ्लॅट अतिशय आलिशान आहे. लोढा मार्केस - पार्कमध्ये विविध प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. उदाहरणार्थ, स्विमिंग पूल, जिम, क्लबहाऊस, मुलांसाठी प्ले एरिया आणि २४ तास सुरक्षा. हा परिसर बीकेसी आणि नरिमन पॉईंट सारख्या बिझनेस हबच्या जवळ आहे. अशा वेळी नोकरदार वर्गासाठी हा अत्यंत सोयीचा आहे.

रोहितचा दुसरा फ्लॅटही याच कॉम्प्लेक्समध्ये आहे, जो थोडा अधिक भाड्यानं देण्यात आला आहे. यावरून या भागात मालमत्तेला चांगली मागणी असल्याचं दिसून येतं. रोहित शर्मा आपल्या क्रिकेटमधील कामगिरीसोबतच त्याच्या स्मार्ट गुंतवणुकीसाठी ओळखला जातो. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक त्यांना चांगला परतावा देत आहे.

'हिटमॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावांचा (२६४) विक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्माला अर्जुन पुरस्कार (२०१५) आणि खेलरत्न (२०२०) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.