स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:33 IST2025-12-22T15:23:45+5:302025-12-22T15:33:15+5:30

History of Banking in India : आज भारतात १२ सरकारी आणि २१ खासगी राष्ट्रीय बँका कार्यरत आहेत. मात्र भारतीय बँकिंग व्यवस्थेचा पाया सुमारे ३४० वर्षांपूर्वीच रचला गेला होता. आज आपल्या देशातील सर्वात जुन्या बँकेचा इतिहास जाणून घेऊ.

भारतातील पहिल्या बँकेचे नाव 'द मद्रास बँक' असे होते. या बँकेची स्थापना १६८३ मध्ये युरोपियन व्यापाऱ्यांनी केली होती.

या बँकेची स्थापना आणि कारभार प्रामुख्याने ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या हाती होता. हे व्यापारी 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या सहकार्याने काम करत असत आणि बँकेतील बहुतेक कर्मचारी हे ब्रिटिश नागरिक होते.

१८०६ मध्ये 'द मद्रास बँक' बंद पडण्याच्या स्थितीत आली होती. त्यामुळे ती बंद करून पुन्हा 'मद्रास बँक' याच नावाने नव्याने सुरू करण्यात आली.

पुढे १८४३ मध्ये या बँकेचे विलीनीकरण 'बँक ऑफ मद्रास'मध्ये करण्यात आले. त्यावेळी ही मद्रास प्रेसिडेन्सीमधील एक महत्त्वाची बँक होती.

१९२१ मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठी घडामोड झाली. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता आणि बँक ऑफ बॉम्बे या तिन्ही बँकांचे एकत्रिकरण करून 'इंपीरियल बँक ऑफ इंडिया'ची स्थापना करण्यात आली.

'द मद्रास बँक'चे मुख्यालय चेन्नईमधील जॉर्ज टाऊन येथे होते. तिचे बहुतांश व्यवहार मद्रास प्रेसिडेन्सीमध्येच केंद्रित होते.

स्वातंत्र्यानंतर, १९५५ मध्ये 'इंपीरियल बँक ऑफ इंडिया'चे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि तिचे नाव बदलून 'स्टेट बँक ऑफ इंडिया' असे ठेवण्यात आले.

आज भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. गेल्या ७० वर्षांपासून ती याच नावाने कार्यरत असून, १६८३ मधील एका छोट्या मद्रास बँकेचे मूळ आजही या विशाल बँकेत दडलेले आहे.