सावजी ढोलकियांनंतर गोविंद ढोलकिया! दोघांनीही गावासाठी दौलत उधळली, सोलार, पाणी, हेलिकॉप्टर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:26 PM2022-09-26T18:26:31+5:302022-09-26T19:02:38+5:30

govind dholakia solar panel Village: गोविंद ढोलकिया हे सावजी ढोलकियांच्यासारखेच श्री राम कृष्ण एक्सपोर्ट या हिऱ्यांच्या कंपनीचे मालक आहेत.

तुम्हा सर्वांना सावजी ढोलकिया माहितीच असतील, अहो तेच दर दिवाळीला कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार भेट देणारे हिरे व्यापारी. आता त्यांचेच गाववाले गोविंद ढोलकिया चर्चेत आले आहेत. या दोन उद्योगपतींनी त्यांच्या गावाला काय काय नाही दिले. दौलत उधळलीय दौलत. सोलार वीज, पाणी, हेलिकॉ़प्टरची सोय केली आहे.

गोविंद ढोलकिया हे सावजी ढोलकियांच्यासारखेच श्री राम कृष्ण एक्सपोर्ट या हिऱ्यांच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मूळ गाव दुधालामध्ये ८५० घरांना सोलर पॅनल रुफटॉप गिफ्ट केले आहेत. यामुळे दुधाला हे गाव देशातील पहिला असा गाव बनला आहे, जो कोणत्याही सरकारी सबसिडीशिवाय १०० टक्के सौर उर्जेवर चालणारा बनला आहे.

गोविंद ढोलकिया यांच्या श्री राम कृष्ण नॉलेज फाऊंडेशनने (SRKKF) हे सोलार पॅनेल उत्पादक गोल्डी सोलर यांच्यासोबत भागीदारीत केला आहे. गावातील 232 घरे, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये एकूण 276.5 किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आली आहेत. गावात वर्षभरापासून बंद असलेल्या काही घरांमध्येच सोलर पॅनल बसवता आलेले नाहीत. ते देखील त्या घरांचे मालक आले की बसविले जाणार आहेत.

या प्रकल्पातून सर्व घरांमध्ये १ ते ३ किलोवॉट पर्यंत वीज तयार होणार आहे. गावच्या सरपंच सीता सतिया यांनी सांगितले की, गावात जवळपास सर्वच घरांवर सोलार पॅनल बसले आहेत. यामुळे गावाच्या विकासावर खूप परिणाम होणार आहे. गावाच्या विकासासाठी वेग येणार आहे. गाववाल्यांना त्यांची कामे करण्यासाठी मदत मिळणार आहे, तसेच वीजेवरील पैसेही वाचणार आहेत.

गोविंद ढोलकिया यांची तब्येत साथ देत नाहीय. गेल्या वर्षी त्यांचे यकृत प्रत्यारोपण झाले होते. यामुळे त्यांना नवजीवन मिळाले. समाजाला काहीतरी परत द्यायचे होते. म्हणून त्यांनी आपल्याच कुटुंबीयांकडून काय करता येईल, याच्या आयडिया मागविल्या होत्या. माझ्या गावकऱ्यांना सोलर पॅनलद्वारे वीज मिळाल्याने पुढील अनेक वर्षे फायदा होत राहिल. या उपक्रमामुळे गावातील अन्य उद्योजकांना देखील अशा कामाची प्रेरणा मिळेल, असे गोविंद ढोलकिया म्हणाले.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये सावजी ढोलकिया यांनी कुटुंबाकडून सरप्राईज गिफ्ट म्हणून मिळालेले हेलिकॉप्टर सुरतमधील वैद्यकीय आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी दान केले. या हेलिकॉप्टरची किंमत 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. तेव्हा सावजी ढोलकिया यांनी सांगितले की, त्यांना माहित नव्हते की त्यांचे कुटुंब एवढी मोठी सरप्राईज गिफ्ट देणार आहे. मी ही भेट नाकारू शकलो नाही, म्हणून सामाजिक कामांना देत आहे.

सावजी ढोलकियांनी आपल्या या गावाची तहान भागविण्यासाठी स्वत:च्या पैशांनी तलाव तयार केले आहे. तिथे छोटे तलाव होते, त्यांनी स्वखर्चाने त्याची खोली वाढविली आहे. या तलावाचे उद्घाटन करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना यावे लागले होते. दोघांनी स्पीड बोटीने आनंदही घेतला. या ठिकाणी पार्क आणि स्पीडबोटीची सोय करण्यात आली आहे. यामुळे गावकऱ्यांना ती देखील एक पर्वणीच ठरली आहे.

टॅग्स :गुजरातGujarat