सरकार देतंय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 04:15 PM2020-06-06T16:15:18+5:302020-06-06T16:59:05+5:30

सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21चा (Sovereign Gold Bond Scheme) तिसरा टप्पा येत्या सोमवारपासून म्हणजेच 8 जूनपासून खरेदीसाठी (सब्सक्रिप्शन) सुरू होणार आहे.

केंद्र सरकार 20 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम लागू करेल, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारच्या वतीने आरबीआयकडून 2020-21ची सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम जारी करण्यात येईल.

आरबीआयने तिसर्‍या टप्प्यातील गोल्ड बाँडसाठी 4,677 रुपये प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, "सब्सक्रिप्शनचा कालावधीपूर्वी तीन व्यापारी सत्रामध्ये (3 जून ते 5 जून 2020) 24 कॅरेट सोन्याच्या क्लोजिंग किंमतीच्या सरासरीच्या आधारे बाँडची नॉमिनल किंमत 4,677 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली गेली आहे."

जे लोक सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठी डिजिटल पद्धतीने अर्ज आणि पैसे भरणार आहेत. त्यांच्यासाठी प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे.

अशा गुंतवणूकदारांसाठी सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 4,627 रुपये असणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीममध्ये आठ वर्षापर्यंत ही गुंतवणूक असते. तसेच, पाच वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहक या स्कीममधून बाहेर पडू शकतील.

भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबं, ट्रस्ट, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या सॉव्हरेन गोल्ड बाँडची खरेदी करू शकतात.

सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम अंतर्गत एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त चार किलोग्रॅमपर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते.

याचबरोबर, अविभाजित हिंदू कुटुंब जास्तीत जास्त चार किलो सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. तसेच, एखादे ट्रस्ट 20 किलोग्रॅम पर्यंतचे सोन्याचे बाँड खरेदी करु शकते.

दरम्यान, सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम म्हणजेच नागरिकांना प्रत्यक्ष सोन्याचे वस्तूऐवजी बाँडमध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या गुंतवणूक करू शकाल तसेच व्यवसायात सुद्धा वृद्धी येईल अशी अपेक्षा आहे.