सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:59 IST2025-09-17T10:48:58+5:302025-09-17T10:59:18+5:30
सोन्याचे वाढते दर, कमी व्याजदर यामुळे लोकांकडून व्यवहार्य आर्थिक पर्याय; वाढत्या किमतींचा लोकांच्या खिशासोबतच परंपरांवरही मोठा परिणाम

मर्यादित उत्पन्न असलेले कर्जदार तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एमएफआय) कर्ज घेण्याऐवजी मोठ्या प्रमाणात सोने तारण कर्ज घेत आहेत. त्यामुळे जून २०२५ अखेर सोने तारण कर्जात वार्षिक आधारावर तब्बल १२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वाढलेले सोन्याचे दर, सोने तारण कर्जांवरील कमी व्याजदर व ‘एमएफआय’च्या कडक कर्जनियमांमुळे सोने तारण कर्ज घेण्याचा कल वेगाने वाढत आहे. जुलै २०२५ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची रक्कम २.९४ लाख कोटी रुपये झाली. ती वर्षभरापूर्वीपेक्षा १२२ टक्क्यांनी जास्त आहे. याउलट, क्रेडिट कार्ड कर्ज अवघे ६ टक्के वाढून २.९१ लाख कोटी रुपये, तर वैयक्तिक कर्ज ८ टक्के वाढून १५.३६ लाख कोटी रुपये झाले.
महिला वळल्या हलक्या व फॅन्सी दागिन्यांकडे वाढत्या किमतींबरोबरच आता सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे वजन आणि डिझाइन बदलू लागले आहे. महिला आता जड दागिन्यांपेक्षा हलक्या व फॅन्सी दागिन्यांकडे झुकत आहेत.
कर्जाची मागणी कुठे? गुजरात, महाराष्ट्रासारख्या राज्यांत तसेच ओडिशासारख्या पूर्वेकडील राज्यांत सोने तारण कर्जाची मागणी जोरात.
सोन्या दर वाढला ४४ टक्क्यांनी : २०२५ मध्ये सोन्याचा दर ४४.१४ टक्क्यांनी वधारून प्रति १० ग्रॅम १,१३,८०० रुपयांवर पोहोचला. ३१ डिसेंबर २०२४ रोजी तो ७८,९५० रुपये होता.
अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करेल, या अपेक्षांमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सोन्याच्या भावात तब्बल १,८०० रुपयांची वाढ झाली.
सोन्याचा भाव १,१५,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही उसळी दिसली. चांदीचा भाव ५७० रुपयांनी वाढून १,३२,८७० रुपये प्रति किलो (करांसह) झाला.
कमल सभलोक यांनी सांगितले की, सोन्यावर कर्ज घेणे आता कलंक मानले जात नाही. उलट हा आता व्यवहार्य आर्थिक पर्याय मानला जातो. त्यामुळे सोने तारण कर्ज झपाट्याने वाढत आहे.
तीनपेक्षा जास्त कर्जदाते असलेल्या कर्जदारांची संख्या जून २०२५ पर्यंत ५.७ दशलक्षांवरून ३.१ दशलक्षांवर आली आहे. कडक नियमांमुळे अनेकांना दागिने तारण ठेवावे लागत आहेत.