Go Fashion चे जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी दिले ९० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:13 PM2021-11-30T13:13:44+5:302021-11-30T13:22:10+5:30

Go Fashion ने शेअर मार्केटमध्ये IPO च्या माध्यमातून पहिल्याच दिवशी १०१३ कोटींचे भांडवल उभारले असून, गुंतवणूकदारांनाही मालामाल केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असलेल्या शेअर मार्केटमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, या पडझडीतून आता बाजार हळूहळू सावरताना दिसत आहे.

याशिवाय विविध क्षेत्रातील कंपन्यांचे आयपीओ सादर होत आहेत. यातच सौंदर्य प्रसाधनांमधील आघाडीची कंपनी असलेल्या Go Fashion ने भांडवली बाजारात प्रवेश केला आहे.

IPO मध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांची दुप्पट कमाई झाली. गो फॅशनचा शेअर भांडवली बाजारात इश्यू प्रॉईसच्या तुलनेत तब्बल ९० टक्के अधिक दराने सूचीबद्ध झाला.

मुंबई शेअर बाजारात Go Fashion चा शेअर १३१६ रुपयांवर सूचीबद्ध झाला. IPO साठी कंपनीने प्रती शेअर ६९० रुपये किंमत निश्चित केली होती. जोरदार नोंदणी नंतर शेअरने इंट्रा डेमध्ये १३४१ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

तर, राष्ट्रीय शेअर बाजारात गो फॅशनची १३१० रुपयांना नोंदणी झाली. Go Fashion ने बाजारातून १०१३.६१ कोटींचे भांडवल उभारले. कंपनीची समभाग विक्री योजना १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान खुली होती.

या शेअर विक्रीला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा १००.७३ पटीने तर किरकोळ गुंतवणूककारांचा हिस्सा ४९.७० पटीने सबस्क्राईब झाला होता. त्यामुळे शेअरची चांगली नोंदणी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, पुढील ६-७ वर्षात देशात २००० विशेष ब्रँड आउटलेट उघडण्याची कंपनीची योजना आहे. सध्या कंपनीचे देशभरात ४५९ विशेष ब्रँड आउटलेट आहेत.

गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर, मॉनेटरी ऑथोरिटी ऑफ सिंगापूर, नोमुरा, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी, फिडेलिटी, एसबीआय म्युच्युअल फंड (एमएफ), आयसीआयसीआय प्रुडेंशियल एमएफ, एचडीएफसी एमएफ, अॅक्सिस एमएफ, आदित्य बिर्ला सन लाइफ एमएफ आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी यांचा अँकर गुंतवणुकारांमध्ये समावेश आहे.

पेटीएमच्या निराशजनक नोंदणीनंतर प्राथमिक बाजारात काहीशी नकारात्मकता तयार झाली होती. मात्र आठवडाभरातच हे मळभ दूर झाले असून, तेजीची छटा पसरली आहे. याचे निमित्त ठरले गो फॅशनच्या शेअरची नोंदणी. या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.