अमेरिकेच्या शेजारी देशात भारताच्या तुलनेत १०० पट जास्त महागाई; 'हे' १० देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:41 IST2026-02-17T15:25:40+5:302026-02-17T15:41:53+5:30

Inflation Rate : महागाई म्हणजे किमतींमध्ये सतत वाढ होणे, ज्यामुळे पैशाची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. भारतात किरकोळ महागाई दर २.७५% आहे. अनेक देशांमध्ये तो ५०% पेक्षा जास्त आहे.

फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा किरकोळ महागाई दर केवळ २.७५% इतका आहे, तर अन्नधान्याची महागाई २.१३% नोंदवण्यात आली आहे.

जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती सातत्याने वाढतात, तेव्हा त्याला महागाई म्हणतात. यामुळे लोकांच्या पैशांची खरेदी करण्याची शक्ती कालांतराने कमी होत जाते.

जगातील सर्वाधिक महागाईचा देश: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेजुएला हा देश सध्या जगातील सर्वात महागडा देश ठरला आहे. २०२५ मध्ये या देशाचा महागाई दर तब्बल २६९.९% इतका नोंदवला गेला आहे.

राजकीय अस्थिरता, चलनी नोटांची अमर्याद छपाई आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध यामुळे व्हेनेजुएलाचे चलन 'बोलिव्हर'चे मूल्य कमालीचे घसरले असून तिथे महागाईचा भडका उडाला आहे.

महागाईच्या यादीत दक्षिण सुदान (९७.५%), झिम्बाब्वे (८९%) आणि सुदान (८७.२%) हे देश व्हेनेजुएलानंतर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

आशिया खंडात इराण (४२.४%), तुर्किये (३४.९%) आणि आपला शेजारी देश म्यानमार (३१%) या देशांमध्येही महागाईने जनता होरपळून निघत आहे.

कमी विकसित देशांमध्ये मध्यवर्ती बँकिंग यंत्रणा मजबूत नसते. अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी चलनात फेरफार केल्यामुळे तिथे महागाई नियंत्रणाबाहेर जाते.

ज्या देशात महागाई जास्त असते, तिथे व्याजाचे दरही खूप जास्त असतात. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये महागाईचे प्रमाण कमी आणि स्थिर असते, ज्यामुळे तिथल्या सामान्य जनतेवर आर्थिक ताण कमी पडतो.