Adani Group Gujarat: गुजरातची दिवाळी! अंबानीनंतर अदानी करणार ३७००० कोटींची गुंतवणूक; टाटा, जिंदलला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:59 AM2022-01-15T10:59:35+5:302022-01-15T11:07:37+5:30

Adani Group Gujarat: गुजरातमधील अदानी ग्रुपची गुंतवणूक आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकट करेल, असे सांगितले जात आहे.

गुजरात राज्याला जानेवारीतच बंपर लॉटरी लागली असून, रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांच्या पाठोपाठ लगेचच अदानी ग्रुपचे गौतम अदाना कोट्यवधींची गुंतवणूक करत आहेत.

अदानी ग्रुपने गुजरातमध्ये पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी आणि इतर व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी दक्षिण कोरियाची कंपनी पॉस्कोसोबत तब्बल ५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा प्राथमिक करार केला आहे. हा करार एकदा तो प्रत्यक्षात आला की, अदानी ग्रुपचा पोलाद क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगितले जात आहे.

गुजरातच्या मुंद्रा येथे हरित, पर्यावरण पूरक पोलाद कारखान्याच्या स्थापनेसह इतर उद्योगांच्या व्यावसायिक संधी शोधण्यास सहमती दर्शविली आहे. यामध्ये पाच अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतात पोलाद प्रकल्प उभारण्याचे पॉस्कोचे स्वप्न पूर्ण होत आहे.

काही वर्षांपूर्वी ओदिशामध्ये भूसंपादनावरून झालेल्या विरोधानंतर पॉस्कोला १२ अब्ज डॉलर्सचा पोलाद प्रकल्प उभारण्याच्या योजनेतून माघार घ्यावी लागली होती. दोन्ही कंपन्या आपापल्या स्तरावर किती गुंतवणूक करतील, याची माहिती निवेदनात देण्यात आली नाही. याशिवाय भागीदारीचा तपशील देण्यात आलेला नाही.

मुदंडा येथील प्रस्तावित प्रकल्प २०२६ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्याची उत्पादन क्षमता वार्षिक ५० लाख टन असेल. पॉस्को ही दक्षिण कोरियाची सर्वांत मोठी पोलाद उत्पादक कंपनी आहे आणि रासायनिक, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

ही भागीदारी भारताच्या उत्पादन उद्योगाच्या वाढीस हातभार लावेल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकट करेल. यामुळे हरित व्यवसायातील भारताचे स्थानही मजबूत होईल, असे अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे यामध्ये ग्रीन एनर्जीचाही वापर केला जाणार आहे.

सध्या भारतात जेएसडब्ल्यू (JSW) स्टील ही पोलाद उत्पादनाच्या क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी दरवर्षी २७ दशलक्ष टन, सेल १९.६ दशलक्ष टन प्रतिवर्ष, टाटा स्टील १९.४ दशलक्ष टन, आर्कलर मित्तल निप्पॉन १० दशलक्ष टन आणि जिंदाल स्टील अँड पॉवर दरवर्षी ८.६ दशलक्ष टन उत्पादन करते.

पुढील तीन ते पाच वर्षांत सध्याचे प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये २५००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. रिलायन्सने जिओचे स्वतःचे टेलिकॉम नेटवर्क 5G मध्ये रूपांतरित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांत ७५०० कोटी रुपये आणि पुढील पाच वर्षांत रिलायन्स रिटेलमध्ये ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी येत्या दशकात गुजरात राज्यात तब्बल ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आज एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.

यात कंपनी आगामी काळात गुजरातमध्ये एक लाख मेगावॅटची रिन्यूएबल एनर्जीपावर प्लांट आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये जवळपास २५ हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत.

आगामी काळात गुजरातमध्ये एक लाख मेगावॅटची रिन्यूएबल एनर्जीपावर प्लांट आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कंपनी सौर फोटोवोल्टिक मॉड्युल, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलाइजर, ऊर्जा भंडारण बॅटरी आणि फ्यूअल सेलच्या उत्पादनासाठी कारखान्यांची उभारणी करणार आहे.

यासाठी जवळपास ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या योजनांअंतर्गत राज्यात जवळपास १० लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.