आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम

By जयदीप दाभोळकर | Updated: October 27, 2025 09:18 IST2025-10-27T09:07:50+5:302025-10-27T09:18:29+5:30

New Rules fro November: १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि रोजच्या जीवनावर होईल. या बदलांमध्ये आधार कार्डपासून ते बँकिंग, गॅस सिलिंडर आणि म्युच्युअल फंड पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.

New Rules fro November: १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि रोजच्या जीवनावर होईल. या बदलांमध्ये आधार कार्डपासून ते बँकिंग, गॅस सिलिंडर आणि म्युच्युअल फंड पर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. जर तुम्ही वेळेवर अपडेट राहिला नाहीत, तर तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. १ नोव्हेंबरपासून लागू होणारे ५ मोठे बदल काय आहेत जाणून घेऊ.

१ नोव्हेंबरपासून UIDAI ने आधार कार्ड अपडेटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक यांसारखी आवश्यक माहिती आधार केंद्रावर न जाता ऑनलाईन अपडेट करू शकता. केवळ बायोमेट्रिक माहिती (जसं की फिंगरप्रिंट किंवा आईरिस स्कॅन) यासाठीच आधार केंद्रावर जाणं आवश्यक असेल. नवीन प्रणालीनुसार, UIDAI तुमची माहिती पॅन, पासपोर्ट, रेशन कार्ड, मनरेगा आणि शालेय नोंदी यांसारख्या सरकारी डेटाबेससह ऑटोमॅटिकली व्हेरिफाय करेल. म्हणजेच, आता कागदपत्रं मॅन्युअली अपलोड करण्याचा त्रास संपणार आहे.

जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर हा बदल तुमच्यावर थेट परिणाम करेल. आता असुरक्षित क्रेडिट कार्डांवर (Unsecured Credit Card) ३.७५% शुल्क लागू करण्यात आलं आहे. तसेच, CRED, CheQ, Mobikwik इत्यादी थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे जर तुम्ही शाळेची किंवा कॉलेजची फी भरल्यास, त्यावर १% अतिरिक्त शुल्क लागेल. परंतु, जर तुम्ही शाळेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा तिच्या POS मशीनद्वारे पेमेंट केलं, तर कोणताही शुल्क लागणार नाही. याशिवाय, ₹१,००० पेक्षा जास्त वॉलेट लोड केल्यास १% शुल्क भरावं लागेल.

गुंतवणूकदारांसाठीही १ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होतील. SEBI नं म्युच्युअल फंड्समध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता जर एखाद्या AMC चे (Asset Management Company) अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक ₹१५ लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असतील, तर कंपनीला ही माहिती आपल्या अनुपालन अधिकाऱ्याला (Compliance Officer) द्यावी लागेल.

बँकिंग सिस्टीममध्येही यावेळी मोठा बदल होणार आहे. १ नोव्हेंबरपासून ग्राहक त्यांच्या बँक खाती, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी आता चार लोकांपर्यंत नॉमिनी बनवू शकतील. हा बदल Banking Law (Revision) Act 2025 अंतर्गत लागू होईल. पूर्वी जिथे फक्त एकच नॉमिनी बनवण्याची सुविधा होती, तिथे आता ग्राहक कोणाला किती हिस्सा द्यायचा हे ठरवू शकतात. जर पहिला नॉमिनी नसेल, तर त्याचा हिस्सा आपोआप दुसऱ्या नॉमिनीकडे हस्तांतरित होईल.

दर महिन्याप्रमाणेच या वेळीही १ नोव्हेंबर रोजी LPG, CNG आणि PNG च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे CNG आणि PNG गॅसच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.