FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख

By जयदीप दाभोळकर | Updated: July 24, 2025 09:18 IST2025-07-24T09:10:59+5:302025-07-24T09:18:11+5:30

Investment Tips: तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस हे केवळ पत्रं पाठवण्याचं ठिकाण नाही तर ते असं ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवू शकता आणि फायदेशीर व्यवहार करू शकता.

Investment Tips: तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस हे केवळ पत्रं पाठवण्याचं ठिकाण नाही तर ते असं ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवू शकता आणि फायदेशीर व्यवहार करू शकता. विशेषतः जर तुम्ही निवृत्त असाल किंवा तुमच्या निवृत्तीची योजना आखत असाल, तर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. सरकारच्या हमीसह येणारी ही योजना केवळ उत्तम व्याजच देत नाही तर दरमहा निश्चित उत्पन्न देखील देते.

सध्या, SCSS योजनेत ८.२ टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे, जे बहुतेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा खूपच चांगलं आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुमचे पैसे त्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत, कारण ही योजना सरकार चालवते आणि त्याची हमी देखील सरकार देते.

जर एखाद्या व्यक्तीनं या योजनेत ३० लाख रुपये एकरकमी गुंतवले तर त्याला दरवर्षी सुमारे २.४६ लाख रुपये व्याज मिळतं. ही रक्कम तिमाही आधारावर खात्यात येते, म्हणजेच दर तीन महिन्यांनी सुमारे ६१,५०० रुपये नियमित उत्पन्न मिळतं आणि दरमहा सरासरी २०,५०० रुपये उत्पन्न मिळतं. यामुळे निवृत्त लोकांना त्यांच्या मासिक गरजा पूर्ण करण्यास खूप मदत होते.

एससीएसएस योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, व्यक्तीचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. दरम्यान, ५५ ते ६० वर्षे वयोगटातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सरकारी कर्मचारी आणि ५० ते ६० वर्षे वयोगटातील संरक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेले व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसंच, पती-पत्नी संयुक्त खातं देखील उघडू शकतात.

या योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी आहे आणि गरज पडल्यास ती आणखी ३ वर्षांसाठी वाढवता येते. दरम्यान, जर गुंतवणूकदारानं एक वर्षाच्यापूर्वी खातं बंद केलं तर त्याला कोणतंही व्याज मिळणार नाही. त्याच वेळी, दोन वर्षापूर्वी खातं बंद केल्यास जास्त दंड आकारला जातो आणि दोन ते पाच वर्षांच्या दरम्यान खातं बंद केल्यास व्याजाच्या १ टक्के रक्कम वजा केली जाते.

एससीएसएस हा केवळ एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय नाही तर, कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट देखील देतो. याचा अर्थ निवृत्त लोकांसाठी दुहेरी फायदा आहे. यात तुमचं उत्पन्न सुरक्षितही राहतं आणि कराची बचतही होते.