विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 08:51 AM2024-06-18T08:51:15+5:302024-06-18T09:25:37+5:30

भारतातील राजा-महाराजांचं आलिशान जीवन हे कायमच लोकांना आकर्षित करत आलंय. त्यांच्या श्रीमंतीच्या कहाण्या आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. दरम्यान, महाराजांकडे असलेल्या नेकलेसची किंमत तब्बल २४८ कोटी रुपये होती.

भारतातील राजा-महाराजांचं आलिशान जीवन हे कायमच लोकांना आकर्षित करत आलंय. त्यांच्या श्रीमंतीच्या कहाण्या आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. त्यांच्याकडे आलिशान राजवाडे, विदेशी लक्झरी कार आणि जगातील सर्वात मौल्यवान रत्नं असत. असेच एक महाराजा होते ते म्हणजे पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंह. त्याचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं.

१९२८ मध्ये महाराजा भूपिंदर सिंग आपल्या ४० नोकरांसह आणि मौल्यवान रत्नांनी भरलेल्या पेट्या घेऊन पॅरिसला पोहोचले. त्याच्याकडे माणिक, पाचू, मोती आणि हिरे अशी मौल्यवान रत्नं होती. जगातील सर्वात महागडा आणि आलिशान हार बनवण्यासाठी ते पॅरिसला पोहोचले होते. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध ज्वेलर 'बुचरॉन मेसन'ची निवड केली.

'बुचरॉन मेसन'नं ७,५७१ हिरे, १,४३२ पाचू आणि इतर रत्नांचा वापर करून एक मोठा हार तयार केला. त्याचे एकूण १४९ भाग होते. पण, महाराजांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती फ्रेंच ज्वेलर 'कार्टियर'मुळे. 'कार्टियर'नं महाराजांच्या रत्नांपासून 'पटियाला नेकलेस' नावाचा अप्रतिम हार तयार केला. या नेकलेसमध्ये 'डी बिअर्स यलो डायमंड' (जगातील सातवा सर्वात मोठा हिरा) लावण्यात आला होता. याशिवाय प्लॅटिनममध्ये आणखी २९०० हिरे जोडण्यात आले होते.

'बुचरॉन मेसन'नं ७,५७१ हिरे, १,४३२ पाचू आणि इतर रत्नांचा वापर करून एक मोठा हार तयार केला. त्याचे एकूण १४९ भाग होते. पण, महाराजांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती फ्रेंच ज्वेलर 'कार्टियर'मुळे. 'कार्टियर'नं महाराजांच्या रत्नांपासून 'पटियाला नेकलेस' नावाचा अप्रतिम हार तयार केला. या नेकलेसमध्ये 'डी बिअर्स यलो डायमंड' (जगातील सातवा सर्वात मोठा हिरा) लावण्यात आला होता. याशिवाय प्लॅटिनममध्ये आणखी २९०० हिरे जोडण्यात आले होते.

महाराजा भूपिंदर सिंग यांना दागिन्यांची आवड तर होतीच, पण महागड्या गाड्या ठेवायलाही त्यांना आवडत होतं. स्वत:चं विमान विकत घेणारे ते भारतातील पहिले व्यक्ती होते. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक रोल्स रॉयस कार्स होत्या. महाराजा भूपिंदरसिंग यांना नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहायचे होतं. त्यामुळेच त्यांनी 'पटियाला नेकलेस' बनवण्याचा निर्णय घेतला.

'कार्टियर'च्या कागदपत्रांनुसार, काश्मीरच्या महाराजांनी अनेक अनमोल वस्तू तयार केल्याचं जेव्हा काश्मीरच्या महाराजा भूपिंदर सिंग यांना कळलं तेव्हा त्यांनी असंच काहीतरी करायचं ठरवलं. त्यांनी आपल्या शाही दागिन्यांनी भरलेले बॉक्स 'कार्टियर'ला पाठवले.

'कार्टियर'नं तीन वर्षांच्या मेहनतीनंतर 'पटियाला नेकलेस'ची रचना केली. या नेकलेसला 'डी बिअर्स यलो डायमंड' लावण्यात आला होता. त्याचं वजन २३४ कॅरेटपेक्षा जास्त होतं. याशिवाय प्लॅटिनमच्या पाच तारांत आणखी २९०० हिरे जोडण्यात आले होते. संपूर्ण हाराचं वजन ९६२.२५ कॅरेट होतं.

'पटियाला नेकलेस' अखेरचा १९४८ मध्ये दिसला होता, जेव्हा भूपिंदर सिंग यांचे पुत्र यदविंदर सिंग यांनी तो परिधान केला होता. यानंतर तो हार शाही खजिन्यातून गायब झाला. अनेक वर्षांनंतर हा हार पुन्हा सापडला, पण त्यातून अनेक रत्ने आणि मुख्य हिरे गायब होते. आता हा नेकलेस पुन्हा 'कार्टियर'कडे आला आहे.

दरम्यान, हरवलेल्या रत्नांची जागा प्रति रत्नांनी घेतली आहे. 'कार्टियर'च्या म्हणण्यानुसार, आज 'पटियाला नेकलेस' बनवला तर त्याची किंमत जवळपास ३० मिलियन डॉलर्स (सुमारे २४८ कोटी रुपये) असेल.