EPF खातेधारकांना मिळू शकतं अधिक व्याज; बोर्डाच्या बैठकीत 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:42 IST2022-07-18T17:34:13+5:302022-07-18T17:42:34+5:30
EPFO New Update: ईपीएफओ (EPFO) बोर्ड स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकते. जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकेल.

नवी दिल्ली : ईपीएफ (EPF) बोर्डाने अलीकडेच 2021-22 आर्थिक वर्षासाठी ईपीएफ दर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे खातेधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परंतु ईपीएफओ (EPFO) बोर्ड स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकते. जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकेल.
ईपीएफओ बोर्डाची बैठक 29 आणि 30 जुलै 2022 रोजी होणार आहे, ज्यामध्ये शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा सध्याच्या 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते. जेणेकरून शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळू शकेल आणि ईपीएफओच्या खातेदारांना अधिक व्याज देता येईल.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, सीबीटीची उपसमिती एफआयएसीने इक्विटी आणि इक्विटी संबंधित गुंतवणूक मर्यादा 5-15 टक्क्यांवरून 5-20 टक्के वाढवण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, शेअर बाजारातील ईपीएफओच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यास कामगार संघटना विरोध करत आहेत. या गुंतवणुकीवर कोणतीही सरकारी हमी नाही, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
खरंतर, ईपीएफओच्या वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीने शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या, ईपीएफओ आपल्या निधीपैकी फक्त 5 ते 15 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे गुंतवते. ईपीएफओला 2021-22 मध्ये इक्विटी म्हणजेच स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीतून 16.27 टक्के परतावा मिळाला आहे, जो 2020-21 मध्ये 14.67 टक्के होता.
जे Debt मध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कितीतरी जास्त आहे. ईपीएफओने 15 वर्षांसाठी न्यूक्लियर पॉवर बाँड्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यावर वार्षिक 6.89 टक्के व्याज दिले जाईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या बाँड्सवर 7.27 टक्क्यांवरून 7.57 टक्के व्याज मिळत आहे. अर्थात, सरकारी बाँड्स ते कॉर्पोरेट बाँड्समधील गुंतवणुकीवर ईपीएफओला कमी परतावा मिळत आहे.
ईपीएफओवर आपल्या गुंतवणूकदारांना अधिक व्याज देण्याचा दबाव देखील आहे, तो देखील जेव्हा ईपीएफओने मार्च 2022 मध्ये 2021-22 साठी ईपीएफ दर 4 दशकातील सर्वात कमी 8.1 टक्क्यांवर आणला होता. यामुळेच शेअर बाजारातील गुंतवणूक ईपीएफओ वाढवू शकते जेणेकरून ते अधिक परतावा मिळवू शकेल आणि ईपीएफओ खातेधारकांना अधिक व्याज देऊ शकेल.
दरम्यान, ईपीएफओच्या वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीच्या निर्णयावर ईपीएफओ बोर्डाची मंजुरी घ्यावी लागेल, ज्याचे सदस्य देखील ट्रेड युनियनचे प्रतिनिधी आहेत. मार्च 2021 पर्यंत ईपीएफओजवळ 15.69 लाख कोटी रुपयांचा कॉरपस होता.