डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
By हेमंत बावकर | Updated: September 22, 2025 13:47 IST2025-09-22T13:36:14+5:302025-09-22T13:47:32+5:30
DMart new GST Bill After 22 September : आजपासून जीएसटीच्या दरात कपात लागू झाली असून, याचा थेट फायदा ग्राहकांना मिळत आहे. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ते रोजच्या गरजेच्या वस्तूपर्यंत अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. अशातच, डीमार्टसारख्या मोठ्या रिटेल चेनमध्ये या कपातीचा फायदा ग्राहकांना मिळतोय की नाही, याबद्दल उत्सुकता होती.

आजपासून जीएसटीचे दर कमी झाले आहेत. वाहनांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाद्यपदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत. अशातच डीमार्ट सारख्या ठिकाणी आज बरीच कमी प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली. पहिल्याच दिवशी डीमार्टने जीएसटी कमी केलेला का? दैनंदिन वस्तूंवर किती जीएसटी लागला? हे समोर आले आहे.
डीमार्टमध्ये एक सूचना लिहिलेली होती. डीमार्टमध्ये अनेक वस्तू असतात, यामुळे प्रत्येक वस्तूची नवीन किंमत एका रात्रीत बदलणे, त्यावर प्रिंट करणे कोणालाच शक्य नव्हते. यामुळे वस्तूंवर डीमार्ट प्राईज जुनीच होती. तसेच रॅकवर जो डीमार्टचा डिस्काऊंटचा छापील टॅग असतो तो देखील तसाच होता.
परंतू, या सुचनेनुसार हे फलक बदलले जात होते. बिलिंग प्रणालीमध्येही नवीन कमी झालेल्या किंमती आधीच अपडेट केल्या गेल्या आहेत. वस्तूंवरील किंमत, डिस्काऊंट किंमत यापेक्षा बिलावरील किंमत कमी झालेली असणार आहे, असे त्यात म्हटले होते.
पुण्यात एका ग्राहकाने डीमार्टमध्ये जवळपास ८,८५७ रुपयांची खरेदी केली. बिलामध्ये डाळी, कडधान्ये, दूध, पोहे, मीठ आदी गोष्टी शून्य टक्के जीएसटीमध्येच आल्या आहेत.
तर तूप, बटर, श्रीखंड, पॅकेज्ड कडधान्ये जसे की मूंग, चवळी, वाटाना आदी हे ५ टक्के जीएसटी मध्ये आले आहेत. चहा पावडर, मसाला, तेल, साखर, बिस्कीटे, टोस्ट, टूथपेस्ट व इतर गोष्टी या देखील ५ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत.
तर कपड्याचा, अंघोळीचा, भांड्या साबणासह सौंदर्य प्रसाधणाच्या वस्तू या १८ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत. एकूण ८३९२.२४ रुपयांच्या बिलावर केंद्राचा जीएसटी २३२.६४ आणि राज्याचा जीएसटी २३२.६४ असा मिळून ४६५.२८ एवढा जीएसटी लागला आहे.
हे एकूण बिल ८८५७.५२ रुपयांचे झाले असून या एकूण ७८ वस्तूंच्या एमआरपीवर ३३०३.६३ रुपये वाचल्याचे या बिलावर म्हटले आहे. एकूण बिलापैकी १७९६.२७ एवढी रक्कम शून्य जीएसटीमध्ये आली आहे.
एकंदरीतच बिल तपासल्यावर सर्व वस्तू या त्या त्या जीएसटी स्लॅबमध्ये आढळल्या आहेत. अनेक वस्तूंवर जुनीच किंमत आहे, परंतू बिलावर जीएसटी कपात झालेली आहे. ग्राहकांचा गोधळ उडू नये म्हणून स्पीकरवरून अनाऊंसमेंटही करण्यात येत आहे.