पतीचा मृत्यू, ३ मुलांची जबाबदारी; हार मानली नाही, उभा केला ₹४०००० कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 08:51 AM2023-10-30T08:51:58+5:302023-10-30T09:08:58+5:30

पतीच्या निधनाचा धक्का आणि तीन मुलांची जबाबदारी पेलत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच पण तो नफ्यातही नेला.

यशाच्या मार्गात अनेकदा अडथळे हे येतातच. पण ते अडथळे पार करून पुढे जायचं असतं. आपण अशाच एका महिलेची कहाणी आज जाणून घेणार आहोत. त्यांनी कॅब चालवून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करणाऱ्या पतीची साथ तर मिळाली. पण त्यांना जेव्हा त्यांची अधिक गरज होती, त्यावेळी ते त्यांच्यात नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही.

पतीच्या निधनाचा धक्का आणि तीन मुलांची जबाबदारी पेलत त्यांनी कठीण काळात व्यवसाय तर सांभाळलाच पण तो नफ्यातही नेला. ही कहाणी आहे रेणुका जगतियानी यांची. फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत १०० व्यक्तींच्या यादीत त्यांचा ४४ वा क्रमांक आहे. त्यांनी ४० हजार कोटी रुपयांची कंपनी केवळ सांभाळलीच नाही, तर नफ्यातही आणली. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

रेणुका जगतियानी यांचे पती कोणत्याही व्यावसायिक किंवा श्रीमंत कुटुंबातील नव्हते. मुकेश मिकी जगतियानी यांनी स्वबळावर व्यवसाय उभारला. त्यांचा जन्म भारतातच झाला पण वयाच्या १७ व्या वर्षी ते अकाऊंटिंग शिकण्यासाठी लंडनला गेले. शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी ते तिथे कॅब चालवत असत. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

कसे बसे कॅब चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक १९७३ मध्ये त्यांचे आई-वडील आणि भावाचं निधन झालं. त्यांना लंडन सोडून बहारीनला जावं लागलं. भावाच्या मृत्यूनंतर मिकी यांनी त्यांचं खेळण्यांचं सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि इकडूनच त्यांचं नशीब पालटलं.

काही वर्षांतच त्यांची संपत्ती ५.२ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. लँडमार्क ग्रुपनं मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारतात आपला व्यवसाय वाढवला होता. त्यांचे जगभरात २२०० आऊटलेट्स आहेत आणि देशभरात ३ कोटी चौरस फूट जागेत आपला रिटेल व्यवसाय चालवत आहे. या समूहाचा जगातील २१ देशांमध्ये व्यवसाय आहे.

सर्व काही ठीक चाललं होतं, पण अचानक मिकी यांची तब्येत बिघडू लागली. बराच काळ ते आजारी होते. परंतु या वर्षी मे महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला. पतीचा मृत्यू आणि तीन मुलांची जबाबदारी सांभाळताना रेणुका यांनी हार मानली नाही. त्यांना ना व्यवसाय चालवण्याचा ना अनुभव होता ना कोणी त्यांना व्यवसायाबाबत शिकवणारं होतं.

मिकी यांनी रेणुका यांना १९९३ मध्येच कंपनीच्या बोर्डात सामील केलं होतं. त्यांना कामाबद्दल माहिती दिली होती. मिकी यांच्या निधनानंतर त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या कामी आलं. त्यांनी लँडमार्कची जबाबदारी तर सांभाळलीच पण ती एक फायदेशीर कंपनीही म्हणूनही उभी केली. आज त्यांची गणना भारतातील अब्जाधीशांमध्ये केली जाते. रेणुका जगतियानी ३९९२१ कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील ४४ व्या सर्वात श्रीमंत महिला आहेत.