आजही 'या' देशांमध्ये मॅकडोनाल्ड्सचे एकही रेस्टॉरंट नाही, यादीतील नावे आश्चर्यकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:54 IST2025-04-03T14:48:36+5:302025-04-03T14:54:19+5:30

Countries Without MacD : भारतात आता छोट्या शहरांमध्येही मॅकडोनाल्ड्सचे रेस्टॉरंट्स नक्कीच सापडतील. पण, तुम्हाला माहित आहे का की जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही मॅकडी रेस्टॉरंट नाही.

बर्गर खायचा असेल तर एकच नाव डोळ्यासमोर येते.. मॅकडोनाल्ड, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये Mc-D असेही म्हणतो. पण, तुम्हाला माहित आहे का की आजही जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट नाही. रेस्टॉरंट नसण्याचं कारणही खूप रंजक आणि खास असल्याचं सांगण्यात येत आहे.

मॅकडी ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट चेनपैकी एक आहे. आतापर्यंत सुमारे १०० देशांमध्ये ४० हजाराहून अधिक रेस्टॉरंट्स उघडली गेली आहेत. असे असूनही, असे अनेक देश आहेत जिथे आजपर्यंत एकही रेस्टॉरंट उघडलेले नाही. याची कारणे राजकीय ते सांस्कृतिक आणि सामाजिक अशी आहेत. स्थानिक खाद्यपदार्थ आणि उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक देशांनी त्यांच्या देशात मॅकडी रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी दिलेली नाही.

मॅकडीने ८०-९० च्या दशकात आफ्रिकन देश झिम्बाब्वे येथे आपले रेस्टॉरंट उघडले. काही कारणास्तव ते बंद करण्यात आले. आर्थिक संकटामुळे लोक रेस्टॉरंटमध्ये जाणे टाळू लागले. हे कंपनीच्या व्यवसायासाठी हानिकारक होते. सध्या, झिम्बाब्वेमध्ये गेल्या २ दशकांपासून एकही रेस्टॉरंट नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३ वर्षांपूर्वीपर्यंत रशियामध्ये सुमारे ८५० मॅकडी रेस्टॉरंट्स सुरू होती. परंतु, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर कंपनीने येथील सर्व रेस्टॉरंट विकले.

त्याचप्रमाणे आइसलँडमध्येही २००९ पर्यंत मॅकडीची ३ उपाहारगृहे सुरू होती. त्यानंतर आलेल्या आर्थिक संकटानंतर कंपनीने येथील सर्व रेस्टॉरंट बंद केले आणि पुन्हा येथे परतले नाही. आफ्रिकन देश नायजेरिया असो वा आशियातील मंगोलिया आणि कंबोडिया, कुठेही मॅकडीचे एकही रेस्टॉरंट नाही.

दक्षिण-पूर्व युरोपीय देश मॅसेडोनियामध्ये २०१३ पर्यंत मॅकडीची रेस्टॉरंट्स होती. परंतु, सतत तोट्यामुळे ते बंद झाले आणि पुन्हा उघडले नाही.

मॅकडी नसलेल्या या यादीत अफगाणिस्तान, क्युबा, मॉन्टेनेग्रो, बोलिव्हिया, घाना, उत्तर अमेरिका, इराण, लाओस, येमेन, जमैका, मालदीव, बार्बाडोस, आर्मेनिया, टोंगा, बांग्लादेश, इराक, नेपाळ, ट्युनिशिया, कझाकिस्तान, सिसिली आणि बेलारूस या देशांची नावे समाविष्ट आहेत.