CNG Price Hike: गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:45 PM2022-05-21T13:45:56+5:302022-05-21T13:54:44+5:30

नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

नवी दिल्ली : सध्या सामान्यांना महागाईचे (Inflation) चटके सोसावे लागत आहेत. सीएनजीचे दर आता पुन्हा एकदा वाढले आहेत. गेल्या सहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. १५ मे रोजी दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात २ रुपये प्रति किलोची वाढ करण्यात आली होती.

यानंतर आता पुन्हा एकदा सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता सीएनजीची किंमत वाढून ७५.५१ रुपये प्रति किलो झाली आहे. वाढत्या खर्चामुळे सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याची माहिती कंपन्यांकडून देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर गॅसच्या सप्लायमध्ये वाढ ही सीएनजीची किंमत वाढण्याचं प्रमुख कारण आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किंमतीमुळे रिक्षाच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी हे दर दुप्पटही झाले आहेत. अशा प्रकारे सीएनजीची किंमत वाढत राहिल्यास यापुढेही रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढत राहण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाली असून, सीएनजी ७८.१७ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये सीएनजी ८३.९४ रुपये प्रति किलो झाला आहे. मुझफ्फरपूर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजीची नवीन किंमत आता ८२.८४ रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे रेवारीमध्ये सीएनजीची किंमत ८६.०७ रुपये प्रति किलो झाली आहे.

कर्नाल आणि कैथलबद्दल बोलायचे झाले तर सीएनजीची किंमत येथे ८४.२७ रुपये प्रति किलो झाली आहे. याशिवाय कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये आजपासून सीएनजी ८७.४० रुपये प्रति किलो या नवीन दराने विकला जात आहे. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर अजमेर, पाली आणि राजसमंद येथे सीएनजीची किंमत ८५.८८ रुपये प्रति किलो झाली आहे.

यावेळी जगभरातील गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या गॅसची मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला आहे. तर दुसरीकडे रशिया युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर लावलेल्या निर्बंधांनंतर तेल-नियंत्रित क्षेत्रांमधून नैसर्गिक वायू उत्पादनाची किंमत दुप्पट झाली.

नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीवरील करही कमी आहे. यामुळे नैसर्गिक वायू वितरकांना मोठा नफा मिळतो. केंद्रीय एजन्सींच्या कमी नियमन किंवा अधिक स्वातंत्र्यामुळे, वितरक त्यांच्या नफ्याचे मार्जिन राखण्यासाठी किमती वाढवल्या जातात.

कालांतराने, सीएनजी खाजगी खरेदीदारांसाठी कमी लोकप्रिय झाला आहे. त्याच वेळी, सार्वजनिक वाहतूक, खाजगी कॅब व्यवसाय आणि ऑटो-रिक्षा चालकांसाठी सीएनजी पसंतीचे इंधन बनले आहे. मात्र किमती वाढल्याने आता या ग्राहकांमध्येही या इंधनाची लोकप्रियता कमी होत आहे. तसेच नवीन ग्राहक आता सीएनजी वाहने खरेदी करण्यातही कमी रस दाखवत आहेत. मात्र, इंधन म्हणून सीएनजी हे पेट्रोल-डिझेलपेक्षा पर्यावरणस्नेही आहे.