म्युच्युअल फंड आणि शेअर्सवर कर्ज घेता येते का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:01 IST2025-04-06T16:48:47+5:302025-04-06T17:01:52+5:30

loan against mutual funds and shares: (चंद्रकांत दडस)अनेकदा लोकांना पैशांची गरज पडते. त्यावेळी लोक गुंतवणुकीला धक्का न लावता कर्जाचा पर्याय निवडतात. अशा वेळी सोने तारण ठेवूनही लोक कर्ज घेतात, पण तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर्सवरही कर्ज घेऊ शकता. जाणून घ्या याबद्दल...

आजच्या आर्थिक युगात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील प्रमुख पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर्स. मात्र, अनेक वेळा तातडीच्या आर्थिक गरजेसाठी ही गुंतवणूक विकावी लागते. अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंड आणि शेअर्सवर कर्ज उत्तम पर्याय आहे.

शेअर्स ही एक मूल्यवान मालमत्ता असून, ती गहाण ठेवून बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले जाऊ शकते. त्यात शेअर्सच्या आधारे कर्ज मिळते. केवळ बँकेने किंवा वित्तीय संस्थेने मान्य केलेल्या शेअर्सवरच कर्ज दिले जाते.

कर्जाची मर्यादा साधारणतः ५०-६०% पर्यंत असते. कर्ज घेताना मार्जिन मेंटेन करावे लागते, म्हणजेच शेअर्सच्या किमतीत घट झाली, तर अतिरिक्त रक्कम भरावी लागू शकते. व्याजदर साधारणतः ९-१२% दरम्यान असतो.

म्युच्युअल फंड युनिट्स गहाण ठेवून बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले जाऊ शकते. इक्विटी आणि डेट फंड दोन्हींवर कर्ज मिळू शकते.

इक्विटी म्युच्युअल फंडसाठी कर्जमर्यादा ५०% पर्यंत, तर डेट फंडसाठी ७०-८०% पर्यंत असते. कर्जाची प्रक्रिया तुलनेने सोपी आणि वेगवान असते.

शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विक्री न करता आर्थिक गरजा भागवता येतात. केवळ आवश्यक रकमेवरच व्याज भरावे लागते. ट्रेडिंग पोझिशन कायम ठेवता येते.

शेअर किंवा म्युच्युअल फंडाच्या मूल्यात घट झाली, तर अधिक मार्जिन भरावे लागू शकते. व्याजदर कमी असला तरी नियमित परतफेड करावी लागते. बाजारातील अस्थिरतेमुळे जोखीम वाढते.