BSNL चं ग्राहकांना गिफ्ट; Free मध्ये मिळतंय 4G SIM; पाहा काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 01:09 PM2021-10-06T13:09:39+5:302021-10-06T13:19:28+5:30

BSNL 4G Free Sim : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना 4G सिम कार्ड मोफत देण्याची घोषणा केली आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना 4G सिम कार्ड मोफत (free sim card) देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरची वैधता 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.

नुकताच कंपनीनं यासंदर्भातील प्रस्ताव आणला होता. आता याचा लाभ त्यांना मिळेल जे 100 रूपये किंना त्यापेक्षा अधिकचं रिचार्ज कूपनचा वापर करतील. आतापर्यंत बीएसएनएल (BSNL) आपल्या केरळ सर्कलमध्ये मोफत सिम कार्ड ऑफर करत आहे.

परंतु ही ऑफर लवकरच इतर परिमंडळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. BSNL च्या माहितीनुसार युझर्स 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचं रिचार्ज करून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय BSNL वर स्विच करू शकतात.

BSNL नवीन ग्राहकांना आणि इतर ऑपरेटरकडून नेटवर्कवर पोर्ट करणाऱ्यांना डिसेंबरपर्यंत मोफत 4G सिम कार्ड ऑफर करत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ही ऑफर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत ही ऑफर तीन तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आता ही ऑफर डिसेंबरपर्यंत मिळणार आहे.

BSNL च्या नव्या 4G सिमकार्डची किंमत 20 रूपये इतरी आहे. जर तुम्ही नवं सिमकार्ड घेतलं किंवा तुम्ही पोर्ट केलं तर तुमच्याकडून हे शुल्क आकारलं जाणार नाही. याचा लाभ बीएसएनएलच्या सेवा केंद्रांमधून, सीएससी आणि रिटेल आऊटलेटमधून घेतला जाऊ शकतो.

मोफत 4G सिम ऑफर व्यतिरिक्त, BSNL ने आपल्या 699 रुपयांच्या प्रमोशनल प्लानची वैधता 90 दिवसांनी वाढवली आहे. कंपनी या प्रमोशनल प्रीपेड प्लानसह 180 दिवसांची वैधताही देते. कंपनीची ही ऑफर 28 सप्टेंबर रोजी संपणार होती, परंतु ती आणखी 90 दिवसांसाठी वाढवली आहे.

699 रुपयांच्या प्रमोशनल प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये दररोज 0.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देण्यात येतात. या ऑफरलाही तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रोमो प्लॅन जानेवारी 2022 पर्यंत वैध असेल. हा प्रोमो प्रीपेड प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना रिटेल स्टोअर्सला भेट द्यावी लागेल.