नावातील एक शब्द गाळल्याने बिअर कंपनीला तब्बल ८० कोटींचा तोटा; नेमकं काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:15 IST2025-02-19T14:13:16+5:302025-02-19T14:15:00+5:30
Bira BEER : एका बिअर उत्पादक कंपनीने आपल्या नावातील एक शब्द गाळल्याने तब्बल ८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीच्या नफ्यातही यामुळे घसरण झाली आहे.

'नावात काय आहे?' हे विल्यम शेक्सपियरचं वाक्य आता जुनं झालं आहे. उलट लोक आता गहन अर्थ असलेले नावं ठेवत आहेत. गरज पडल्यास आपल्या नावाची आद्यक्षरे वापरुन एखाद नवीन शब्दही प्रसूत केला जातो. हे सांगण्यापाठीमागचं कारण म्हणजे एक बिअर उत्पादक कंपनीला याचा चांगलाच फटका बसला आहे. बिअर ब्रँड 'बिरा' असं या कंपनीचे नाव असून ही कंपनी नावातील बदलामुळे अडचणीत आली आहे.
B9 बेवरेजेज प्रावेट लिमीटेडने अलीकडेच नावातून 'Private' हा शब्द काढून टाकला. त्यानंतर B9 Beverages Limited झाले. कंपनीची २०२६ मध्ये IPO लाँच करण्याची योजना होती. त्याचाच हा भाग होता. पण हा छोटासा बदल कंपनीच्या अंगलट आला आहे. हा बदल दीर्घकाळात कंपनीसाठी फायदेशीर करार ठरू शकतो. परंतु, सध्या त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नावात बदल केल्यानंतर कंपनीला आपल्या सर्व उत्पादनांवर नवीन नाव छापावे लागले. यासाठी नवीन लेबल डिझाइन, नोंदणी आणि राज्यांमध्ये नवीन अर्ज प्रक्रिया आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान कंपनीची विक्री अनेक महिने ठप्प झाली. याव्यतिरिक्त, आधीपासून स्टॉकमध्ये असलेली उत्पादने नावाच्या घोळामुळे विक्रीस अडचण निर्माण झाली. परिणामी, कंपनीला इन्व्हेंटरीमध्ये तब्बल ८० कोटींचे थेट नुकसान झाले.
इतकच नाही तर नाव बदलल्यामुळे कंपनीची आर्थिक घडीही विस्कटली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात B९ बेव्हरेजेसचा निव्वळ तोटा ६८ टक्क्यांनी वाढून ७४८ कोटी झाला आहे. कंपनीची एकूण विक्री देखील २२ टक्क्यांनी घसरून आर्थिक वर्ष २०२३ मधील ८१८ कोटी वरून २०२४ मध्ये ६३८ कोटी रुपये झाली.
बिराने दशकभरापूर्वी बेल्जियममधून हेफवेईझेन-शैलीची बिअर आयात करून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. नंतर कंपनीने भारतातच दारूचे उत्पादन सुरू केले. परंतु, यासाठी त्यांनी थर्ड-पार्टी ब्रुअरीजशी भागीदारी केली. B9 Beverages ला पब्लिक लिमिटेड कंपनी बनायचे असल्यामुळे नावात हा बदल केला आहे.