बीडचा तरुण चमकला 'शार्क टँक'मध्ये, गायीच्या गोठ्यात सुरू केली कंपनी; आता कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:43 AM2024-03-13T09:43:20+5:302024-03-13T10:01:23+5:30

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही.

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर असंच यश मिळवलंय बीडच्या दादासाहेब भगत यांनं.

एकेकाळी इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणूनही त्यानं काम केलंय. त्यानं मनात जिद्द ठेवली आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं कामही सुरू ठेवलं. आज त्याच्या स्वत:च्या दोन कंपन्या आहेत. इतकंच काय तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दादासाहेब भगत याचं कौतुक केलंय.

दादासाहेब भगत हा नुकताच शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या संघर्षमय प्रवासानं सर्वच शार्क्सना भावूक केलं. १० वी उत्तीर्ण असलेल्या दादासाहेबनं एकेकाळी ऑफिसबॉय म्हणूनही नोकरी केली. पण आज त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर आपली कंपनी सुरू केलीये.

दादासाहेब भगत याचा जन्म १९९४ मध्ये बीडमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं पुण्यातून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळी त्याला नोकरीची नितांत गरज होती, म्हणून तो इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस बॉय म्हणून रुजू झाला.

इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस, लोकांना चहा-पाणी देणं हे त्याचं काम होतं. या कामासाठी त्याला महिन्याला नऊ हजार रुपये पगार मिळत होता. ही नोकरी आपल्यासाठी नाही याची त्याला कल्पना होती. इन्फोसिसमध्ये काम करताना त्याला सॉफ्टवेअरचं महत्त्व कळलं. यानंतर त्यानं ते शिकायचं ठरवलं.

दादासाहेब भगत यानं कामासोबतच ग्राफिक्स डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा अभ्यास केला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबईत नोकरी मिळाली. यानंतर तो हैदराबादला गेले आणि त्यांनी तिकडे नोकरीबरोबरच C++ आणि Python चा कोर्स केला. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा त्याचा सतत प्रयत्न असायचा.

डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीसोबत काम करताना, पुन्हा वापरता येण्याजोग्या डिझाइन आणि टेम्पलेट्सच्या लायब्ररीवर काम करणं हा एक उत्तम पर्याय असल्याचं त्याला समजलं. इथूनच त्याचं स्टार्टअप सुरू झालं. त्यांनी डिझाइन टेम्प्लेट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली. त्यांनी नुकताच आपला व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्यासोबत एक घटना घडली.

एका अपघातामुळे त्यांना अनेक महिने अंथरुणाला खिळून राहावं लागलं. यादरम्यान त्यानं आपल्या स्टार्टअपची संपूर्ण दिशा ठरवली. २०१५ मध्ये त्यानं त्यांची पहिली कंपनी Ninthmotion सुरू केली. अवघ्या काही वेळातच त्यांच्यासोबत ६,००० ग्राहक जोडले गेले.

दादासाहेब हा तरुण इथेच थांबला नाही, त्यानं ऑनलाइन ग्राफिक्स डिझायनिंगचं काम सुरू ठेवलं. त्यांनी ग्राफिक्स डिझाईनसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केलं, जे कॅनव्हासारखं आहे. खरंतर लॉकडाऊनच्या काळात त्याला गावी जावं लागलं. गावातील गोठ्यात त्यांनी आपले तात्पुरतं ऑफिस सुरू केलं.

शेतातील मित्रांना अॅनिमेशन आणि डिझाईनचे काम शिकवलं आणि नंतर त्यांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली. २०२० मध्ये, त्यांनी सोपं डिझाइनिंग सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्याची दुसरी कंपनी DooGraphics सुरू केली. एकेकाळी नऊ हजार रुपयांची नोकरी करणारा दादासाहेब आज कोट्यवधीची कमाई करत आहेत. २६ सप्टेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात त्याच्या कार्याची प्रशंसा केली होती.

नुकताच दादासाहेब शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकला होता. त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन आता १० कोटी रुपये झालंय. शार्क टंकमध्ये त्यानं २.५ टक्के इक्विटीच्या मोबदल्यात १ कोटींची मागणी केली होती. परंतु बोटचे को-फाऊंडर अमन गुप्ता यांनी त्याच्या कंपनीतील १० टक्क्यांच्या मोबदल्यात १ कोटींची रक्कम देत डील पक्की केली.