आजच्या महागाईच्या काळात खिसा रिकामा होतोय? पैसे वाचवण्याचे चार सर्वात सोपे मार्ग हे घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 09:28 IST2022-07-31T09:25:54+5:302022-07-31T09:28:29+5:30

पैसे वाचवण्याची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे फक्त सुरुवात करणे. एकदा का तुम्ही बचत करण्यास सुरुवात केली की बचत करण्याची सवय लागते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला असता.
अल्प किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून तुम्ही बचत करायला सुरुवात करू शकता. महिन्याकाठी मिळालेल्या ठराविक रकमेतून बचत कशी करावी यासाठी काही सोपे मार्ग पाहू...
तुमच्या खर्चाची नोंद करा
पैशाची बचत सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे तुम्ही किती खर्च करता हे शोधणे. प्रत्येक खर्च, घरगुती वस्तू आणि रोख टीप तसेच नियमित मासिक बिल याची नोंद ठेवा. हे सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक पेन्सिल आणि कागद, एक साधी स्प्रेडशिट किंवा मोफत असणारे ऑनलाइन खर्च ट्रॅक करणारे ॲप वापरू शकता. एकदा तुम्हाला तुमचा खर्च कळाला की आपला पैसा नेमका कुठे जातोय हे लक्षात येईल. त्यानुसार विनाकारण खर्च होणारे पैसे वाचवता येतील.
बजेटमध्ये बचतीचाही समावेश करा
एका महिन्यात तुम्ही किती खर्च करता हे तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही बजेट तयार करण्यास सुरुवात करू शकता. तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचे खर्च किती गरजेचे आहेत, हे लक्षात आले की तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करू शकाल. एकूण उत्पन्नाच्या किमान ४० टक्के बचत करायची आहे हे लक्षात असूद्या.
खर्च कमी करण्याचे मार्ग शोधा
जर तुम्ही आपल्या इच्छेनुसार बचत करू शकत नसाल तर खर्चाला आवर घाला. मनोरंजन आणि बाहेर जेवणासारख्या अनावश्यक गोष्टींवर तुम्ही कमी खर्च करू शकता. कमी किमतीच्या वस्तू वापरा. ब्रॅण्डेड वस्तूंच्या मागे शक्यतो लागू नका. तुमचे बरेचसे जेवण घरीच खाण्याची योजना करा. जेव्हा अनावश्यक खरेदीचा मोह होतो तेव्हा काही दिवस वाट पाहा. नंतर तुम्हाला जाणवेल की ही वस्तू खरेच गरजेची नव्हती.
उद्दिष्टे निश्चित करा
पैशाची बचत करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ध्येय निश्चित करणे. तुम्हाला पैसे नेमके कशासाठी वाचवायचे आहेत हे एकदा ठरले की गुंतवणूक करणे सोपे जाते. जर तुम्ही गाडी घेण्यासाठी गुंतवणूक करत असाल तर ती अल्प काळासाठी असेल आणि मुलांचे शिक्षण किंवा अन्य कारणांसाठी गुंतवणूक करत असाल तर दीर्घकालीन असेल. त्यानुसार तुम्हाला किती पैसे लागतील याचा विचार करा आणि गुंतवणुकीला सुरुवात करा.