Anil Ambani: अनिल अंबानींची 'ही' कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:40 PM2021-04-20T17:40:33+5:302021-04-20T17:45:18+5:30

अनिल अंबानी यांची (anil ambani) रिलायन्स कम्युनिकेशन (reliance communications) दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून उद्योजक अनिल अंबानी (anil ambani) यांचा पाय अधिकाधिक खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनिल अंबानी त्यांच्यापुढे दररोज नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत.

अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. (reliance communications)

रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेली, तर किमान ४० हजार कोटींच्या कर्जावर पाणी सोडावे लागेल या भीतीने सध्या बँकांचा जीव टांगणीला लागला आहे.

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने रिलायन्स कम्युनिकेशनने सध्या असलेल्या स्पेक्ट्रमची विक्री ही सरकारची थकबाकी फेडल्यानंतर करता येईल, असा आदेश दिला आहे. मात्र, या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनला कर्ज देणाऱ्या धनकोंच्या समितीने यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

समायोजित रक्कम म्हणून रिलायन्स कम्युनिकेशनने दूरसंचार खात्याचे २६ हजार कोटी थकवले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशनच्या कर्ज फेडीच्या योजनेला धनकोंनी मंजुरी दिली होती.

मे २०२० पासून हा प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होतात. रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे.

या ३८ बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. तर चायना डेव्हलपमेंट बँकेच्या नेतृत्वात चीन बँकांनी ९ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तसेच एसबीआयने ३ हजार कोटींचे कर्ज दिले असून, एलआयसीचे ३ हजार ७०० कोटी रिलायन्स कम्युनिकेशनने थकवले आहेत.

जून २०१७ पासून रिलायन्स कम्युनिकेशनके एक रुपयांची देखील परतफेड केलेली नाही. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनला कर्ज देणाऱ्या बँकांचे लक्ष आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले आहे.

दरम्यान, कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेला (Yes bank) आपले हेड ऑफिस विकले आहे. अनिल अंबानी यांनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला १,२०० कोटी रुपयांना विकल्याची माहिती मिळाली आहे.