अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:47 IST2024-11-29T09:08:52+5:302024-11-29T09:47:59+5:30
Share Market Investment : जर तुम्ही शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत आपले पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर आज आपण असे पर्याय पाहू, ज्यातून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय नफा कमावू शकता.

Share Market Investment : गेल्या काही काळापासून बाजारात चढ-उताराचं वातावरण आहे. या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार अनेकदा घाबरून जातात आणि कधी कधी चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना नंतर तोटा सहन करावा लागतो. जर तुम्ही शेअर बाजारातील चढ-उताराच्या परिस्थितीत आपले पैसे गुंतवण्यास घाबरत असाल तर आज आपण असे पर्याय पाहू, ज्यातून तुम्ही कोणत्याही तणावाशिवाय नफा कमावू शकता.
एफडी - फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुम्हाला निश्चित व्याज मिळतं. बाजारातील चढउतारांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही एफडीचा लाभ घेऊ शकता.
एसआयपी (सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) - एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोड्या रकमेनं गुंतवणूक सुरू करू शकता. पण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास सरासरीचा फायदा मिळतो आणि बाजारातील चढउतारांचा परिणाम कमी होतो. दीर्घ मुदतीत एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा फायदा होतो आणि परतावा चांगला मिळतो. नफ्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड किंवा बॅलन्स्ड फंड निवडू शकता.
गोल्ड इनव्हेस्टमेंट - सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अस्थिर बाजारातही त्याची किंमत सहसा स्थिर राहते. तुम्ही फिजिकल गोल्ड, गोल्ड ईटीएफ किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दर ज्या पद्धतीनं झपाट्यानं वाढले आहेत, त्यानुसार भविष्यात सोनं तुम्हाला भरपूर नफा मिळवून देऊ शकते.
लघु बचत योजना - पीपीएफ, एनएससी सारख्या विविध छोट्या बचत योजनांमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. बँक आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सर्व योजनांचे पर्याय सहज सापडतील. यामध्ये तुम्हाला गॅरंटीड रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट्सही मिळतील. म्हणजे टेन्शनशिवाय नफा कमावू शकता.
डेट म्युच्युअल फंड - डेट फंडही बऱ्याच अंशी सुरक्षित मानले जातात. डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, ट्रेझरी बिल आणि नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर इत्यादी फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात. कमी जोखीम घेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय आहे. इक्विटीपेक्षा डेट फंड अधिक सुरक्षित मानले जातात. यामध्ये लिक्विडिटीचीही समस्या नाही. म्हणजेच तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमचे पैसे काढू शकता.
तर हे लक्षात ठेवा - डायव्हर्सिफाई, म्हणजे आपले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा, यामुळे जोखीम कमी होते. बाजारातील चढउतारांना घाबरून जाऊ नका आणि भीतीपोटी गुंतवणूक थांबवू नका. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)