Adani Group ला आता सिमेंट उद्योगाची भूरळ; नवीन कंपनी केली स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:53 PM2021-06-13T21:53:06+5:302021-06-13T21:58:43+5:30

आता अदानी समूहाने (Adani Group) सिमेंट उद्योगात एन्ट्री केली असून, भविष्यात स्थावर मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेसकडून नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अदानी समूह दमदार कामगिरी करत असून, या समूहातील अनेक कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे.

याशिवाय भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या काही महिन्यात अदानी समूहातील सर्वच शेअर तेजीत आहेत.

अदानी समुहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत तब्बल ४३ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३.१५ लाख कोटी रूपयांची वाढ दिसून आली. तसंच ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

यातच आता अदानी समूहाने सिमेंट उद्योगात एन्ट्री केली असून, भविष्यात स्थावर मालमत्ता आणि गृहनिर्माण क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्यासाठी अदानी एन्टरप्राइजेसकडून अदानी सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

अदानी एन्टरप्राइजेस लिमिटेडच्या अंतर्गत अदानी सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी सिमेंट उत्पादन आणि विक्री करणार आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये अदानी सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडची नोंदणी करण्यात आली आहे.

कंपनीचे अधिकृत भाग भांडवल १० लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काळात सिमेंट उद्योगात मोठी वाढ अपेक्षित आहे. तसे अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. कोरोना संकटानंतर देशात पायाभूत सेवा क्षेत्रांत मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींचा अंदाज घेत अदानी समूहाने सिमेंट उद्योगात शिरकाव केला असल्याचे सांगितले जात आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. विकसनशील असल्याने देशात पायाभूत सेवा सुविधांमध्ये प्रचंड संधी आहेत.

आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि केरळ ही राज्ये सिमेंट उत्पादनात आघाडीवर आहेत. भारतात सिमेंट उद्योगाची सुरुवात १९१४ मध्ये झाली होती.

पोरबंदरमधून हा उद्योग सुरु झाला मात्र स्वातंत्र्यानंतर या उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. शहरीकरण आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांनी सिमेंट उद्योगात मागील काही दशकात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, अदानी समूहातील अदानी विल्मर या कंपनीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असून, त्या माध्यमातून सुमारे ७ हजार ते ७ हजार ५०० कोटी उभारण्याची शक्यता आहे. अदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंपनीचे खाद्यतेल आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English