पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:00 IST2025-06-20T08:48:21+5:302025-06-20T09:00:08+5:30

Pan Card 2.0 Project: तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि पॅन कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी एक डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे. पाहा काय म्हटलंय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं.

Pan Card 2.0 Project: आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहे. अनेक आर्थिक कामांसाठी पॅन कार्डाची गरज भासते. तर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा काही महत्त्वाची कामं असतील तर त्यासाठी आधार कार्डही आवश्यक आहे.

तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि पॅन कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी एक डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे. हे दस्तऐवज दुसरं कोणतंही नसून आधार कार्ड आहे. १ जुलैपासून नव्या पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (सीबीडीटी) ही माहिती दिली. डिजिटायझेशनच्या माध्यमातून कर भरण्यात उत्तरदायित्व वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

त्याचबरोबर ज्यांच्याकडे पॅन आणि आधार ही दोन्ही कार्ड आहेत, त्यांना हे दोन्ही कार्ड एकत्र लिंक करणंही आवश्यक आहे. विद्यमान पॅनधारकांना कोणत्याही दंडाशिवाय आधार लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत आहे. तसं न केल्यास पुढील वर्षापासून त्यांचं पॅन निष्क्रिय होईल.

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार, आयकर पोर्टलवर पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी जुलैपासून नवे नियम लागू होतील. सध्या एखादी व्यक्ती आपलं नाव, जन्म दाखला किंवा पर्यायी ओळखपत्रांचा वापर करून पॅनसाठी अर्ज करू शकते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आधार-आधारित ऑथेंटिकेशनचं पाऊल डिजिटायझेशनच्या मोहिमेचा एक भाग आहे आणि कर भरण्यात उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. जर तुम्ही १ जुलै २०२५ नंतर नवीन पॅन कार्डसाठी अर्ज केला तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असेल. तुमचा पॅन कार्ड अर्ज पुढे नेण्यासाठी तुमचे आधार कार्ड पडताळणीसाठी वापरलं जाईल.

सध्याच्या पॅनकार्डधारकांनाही आपलं कार्ड आधारशी लिंक करावे लागणार आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास पुढील वर्षापासून ते बंद करण्यात येईल. कर चुकवण्याच्या हेतूनं काही जण इतरांच्या पॅनकार्डचा वापर करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयकर विभागानं पॅन कार्डला आधारशी जोडणं बंधनकारक केलंय. याशिवाय बनावट जीएसटी नोंदणीमध्ये अनेक पॅनकार्डचा वापर केल्याचीही प्रकरणं समोर आली होती.

आयकर विभाग पॅन २.० नावाचा प्रकल्प सुरू करत आहे. पॅन आणि टॅनची प्रणाली आणखी सुधारण्याचा हा एक मार्ग आहे. यामुळे करदात्यांना चांगली सेवा मिळणार आहे. पॅन २.० मुळे पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व कामं सहज पार पडणारेत. ज्यांच्याकडे आधीच पॅनकार्ड आहे त्यांना नव्या नियमांनुसार काहीही करण्याची गरज नाही. त्यांचं पॅनकार्ड पूर्वीप्रमाणेच काम करत राहिल. पॅन २.० मध्ये जुनी पॅनकार्डही वैध राहतील.