वर्षभरापूर्वी 'या' सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची होती हवा, आता अर्धी झाली किंमत; तुमच्याकडे आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:05 IST2025-02-18T12:55:49+5:302025-02-18T13:05:42+5:30
Govt Companies Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदार बऱ्याच काळापासून घसरणीनं त्रस्त आहेत. विशेष म्हणजे ज्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची गेल्या वर्षी हवा होती, त्या सर्व शेअर्सची आज अवस्था वाईट दिसत आहे.

Govt Companies Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदार बऱ्याच काळापासून घसरणीनं त्रस्त आहेत. परिस्थिती अशी आहे की, गेल्या ९ दिवसांपासून सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये आहे. दरम्यान, विशेष म्हणजे ज्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सची गेल्या वर्षी हवा होती, त्या सर्व शेअर्सची आज अवस्था वाईट दिसत आहे. यात एचएएल पासून बीईएलपर्यंतच्या शेअर्सचा समावेश आहे, ज्यांची किंमत नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्यानं घसरली आहे. जाणून घेऊया अशाच पाच शेअर्सबद्दल...
Cochin Shipyard: संरक्षण क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरची किंमत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून निम्म्याहून अधिक घसरलीये. २०२४ मध्ये जुलै महिन्यात या शेअरने २९७९.४५ रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि सोमवारी व्यवहारादरम्यान तो ११९६ रुपयांवर गेला होता. त्यानुसार कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या शेअरची किंमत सुमारे ५५ टक्क्यांनी घसरली आहे.
BEML Ltd: पुढचा शेअर बीईएमएल लिमिटेडचा आहे. गेल्या वर्षीही या शेअरनं जोरदार उसळी घेत ५,४८८ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता, मात्र यंदा शेअर बाजारातील हालचालींच्या दरम्यान हा शेअरही घसरला असून त्याची किंमतही जवळपास निम्म्यानं खाली आलीये. सोमवारी हा शेअर २,६५१.३० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला, जो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा जवळपास ५० टक्क्यांनी कमी आहे.
Rail Vikas Nigam Ltd: भारतीय रेल्वेशी संबंधित आरव्हीएनएल लिमिटेड या कंपनीचे शेअर्सही या यादीत आहेत आणि सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ७ टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या आरव्हीएनएल शेअरनं ६४७ रुपयांचा आकडा गाठला होता आणि सोमवारी या रेल्वे शेअरनं ३३२.५५ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला, जो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे ५० टक्क्यांनी कमी आहे.
HAL Limited: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (HAL) शेअर सर्वाधिक चर्चेत होता. या दरम्यान त्यात जोरदार तेजी दिसली आणि जुलै २०२४ मध्ये त्यानं ५६७४.७५ रुपयांचा उच्चांक गाठला. पण त्यानंतर हा शेअर ३८.४२ टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी कामकाजादरम्या याची किंमत ३३९५ रुपयांपर्यंत घसरली होती. मंगळवारीही त्यात घसरण झाली.
REC Limited: सरकारी कंपनी आरईसी लिमिटेडच्या शेअरमध्येही घसरण होत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये जोरदार वाढीसह ६५४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता आणि आता त्याची किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी झाली आहे. सोमवारी हा शेअर ३८७.१५ रुपयांवर खुला झाला आणि ३७५ रुपयांपर्यंत घसरला. गेल्या वर्षी जुलै २०२४ च्या तुलनेत त्याच्या किंमतीत ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे.
LIC Stock: सरकारी कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीचा शेअरही गेल्या वर्षी शिखरावर पोहोचला होता, पण आतापर्यंत त्यात लक्षणीय घसरण झाली आहे. एलआयसीचा शेअर गेल्या वर्षी जुलैमध्ये १२२२ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता, परंतु त्यानंतर तो सुमारे ४० टक्क्यांनी घसरला आहे. सोमवारी तो ७४४.९५ रुपयांवर व्यवहार करत होता.