गरीब शेतकऱ्याच्या मुलानं उभी केली जगातील तिसरी मोठी कार कंपनी, Hyundaiनं कसं मिळवलं हे स्थान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:57 IST2024-12-16T08:44:38+5:302024-12-16T08:57:08+5:30
Success Story Hyundai : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई वाहनांच्या उत्पादनात जगातील तिसरी आणि मार्केट कॅपच्या बाबतीत १६ वी सर्वात मोठी कंपनी आहे. पाहूया या कंपनीची सुरुवात कशी झाली.

Success Story Hyundai : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई (Hyundai) वाहनांच्या उत्पादनात जगातील तिसरी आणि मार्केट कॅपच्या बाबतीत १६ वी सर्वात मोठी कंपनी आहे. भारतात ही उत्पादनाच्या बाबतीत मारुती सुझुकीनंतर (Maruti Suzuki) दुसरी सर्वात मोठी वाहन कंपनी आहे. ह्युंदाईचा व्यवसाय ऑटो तसंच कन्स्ट्रक्शनसह अनेक क्षेत्रांमध्ये पसरला आहे.
पण जगात या कंपनीची ओळख फक्त वाहनांशीच आहे. नुकताच ह्युंदाईनं आपल्या भारतीय युनिटचा आयपीओ (Hyundai IPO) आणला, जो भारतील आतापर्यंतचा सर्वात मोठा इश्यू होता. या कंपनीची स्थापना चुंग जू-युंग यांनी केली होती, दक्षिण कोरियातील प्रत्येक व्यक्तीला आज त्यांचा अभिमान आहे. चुंग जू-युंग यांचे जीवन संघर्षांनी भरलेलं होतं. अनेकदा त्यांच्या व्यवसायावर मोठी संकटं आली पण त्यांनी हार मानली नाही. चुंग जू-युंग च्या कारकिर्दीवर एक नजर टाकू.
चुंग यांचा जन्म १९१५ मध्ये उत्तर कोरियातील कानवोन प्रांतातील टोन्चोन या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. ७ भावंडांमध्ये ते सर्वात मोठे होते. त्याचे वडील भातशेती करायचे. त्यांना शिक्षक व्हायचं होतं पण कुटुंबाकडे शिकण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी शेती करावी अशी वडिलांची इच्छा होती पण त्यांना शेती करावीशी वाटली नाही.
एके दिवशी ते घरातून पळून गेले आणि एका बांधकाम कंपनीत कामाला लागले. त्यावेळी चुंग यांचं वय केवळ १६ वर्ष होतं. पण दोन महिन्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना शोधून परत आणलं. पण चुंग पुन्हा पळून गेले आणि तो पुन्हा पकडले गेले. असं अनेकदा चाललं.
अखेर १९३४ मध्ये चुंग दक्षिण कोरियाला पळून गेले. तेथे तो एका तांदळाच्या दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि समर्पण पाहून दुकानदारानं त्यांना मॅनेजर बनवलं. १९३७ मध्ये दुकानाचा मालक आजारी पडला आणि त्यांनी आपलं दुकान चुंग यांच्याकडे सोपवलं. अशा प्रकारे चुंग वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी एका दुकानाचे मालक बनले.
पण नशिबानं साथ दिली नाही आणि १९३९ मध्ये जपानी लोकांनी त्यांचे दुकान बंद केलं. यानंतर चुंग यांनी मित्राकडून कर्ज घेऊन वाहनांच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. त्यांचं काम चांगलं चाललं होतं, पण १९४३ मध्ये जपानी लोकांनी पुन्हा एकदा त्यांचा व्यवसाय बंद केला.
१९४५ मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर चुंग यांचं नशीबही पालटलं. १९४६ मध्ये त्यांनी ह्युंदाई या अभियांत्रिकी व बांधकाम कंपनीची स्थापना केली. पण १९५० मध्ये उत्तर कोरियाच्या आक्रमणामुळे चुंग यांना आपला व्यवसाय सोडून बुसानला पळून जावं लागले. युद्ध संपल्यानंतर चुंग यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला.
अमेरिकन लष्कर आणि कोरियन सरकारकडून त्यांना अनेक कंत्राटं मिळाली. पण १९६१ मध्ये जनरल पार्क चुंग-ही सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला पंख लागले. ह्युंदाईला अनेक बांधकाम प्रकल्प मिळाले. याच काळात चुंग यांनी आपला व्यवसाय अनेक क्षेत्रांत पसरवला.
ह्युंदाई समूहात ८६ कंपन्या होत्या. त्यात चिपपासून जहाजापर्यंत सर्व काही बनवलं जायचं. दरम्यान, चुंग यांनी ऑटो सेक्टरमधील क्षमता पाहिली आणि कारच्या डिझाइनवर काम करण्यास सुरुवात केली. त्याला मध्यमवर्गासाठी गाडी बनवायची होती. जवळपास ८ वर्षांच्या मेहनतीनंतर कंपनीनं १९७५ मध्ये आपली पहिली सेल्फ मेड कार पोनी लाँच केली. ती परवडणारी होती आणि त्याचं डिझाइनही उत्तम होतं. ती इतकी यशस्वी झाली की ६० टक्के बाजारपेठ काबीज केली. ह्युंदाईनं १९८२ मध्ये ब्रिटीश बाजारपेठेत प्रवेश केला आणि पहिल्याच वर्षी कंपनीने तिथं सुमारे ३,००० कार विकल्या.
१९८४ मध्ये कंपनीनं कॅनडामध्ये पोनी २ लाँच केली, जी स्वस्त असल्यानं मोठ्या प्रमाणात विकली गेली. १९८६ मध्ये कंपनीने एक्सेल कार अमेरिकेत लाँच केली आणि पहिल्या वर्षी १,७०,००० कार विकून आपली छाप सोडली. अनेक वर्ष ही अमेरिकेतील सर्वाधिक विकली जाणारी कार होती. आज ह्युंदाई जगातील पहिल्या १०० सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये समाविष्ट आहे.
उत्पादनाच्या बाबतीत टोयोटा आणि फोक्सवॅगननंतर ही तिसरी सर्वात मोठी वाहन कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय जगातील १९३ देशांमध्ये पसरलेला आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतात ८ लाखांहून अधिक कार विकल्या होत्या. २००१ मध्ये चुंग यांचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी ह्युंदाईला मोठ्या उंचीवर नेलं होतं.