शेविंग ब्लेडमुळे ५ रुपयांच्या नाण्याचं अस्तित्व धोक्यात? आरबीआयने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:53 IST2024-12-16T12:37:00+5:302024-12-16T12:53:20+5:30

5 rupee coin : तुम्ही लहानपणापासून व्यवहारात वापरत असलेला ५ रुपयांचा ठोकळा आता इतिहास जमा होणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत. पाच रुपयांचे नाणे आता बंद होण्याची शक्यता आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. सध्या बाजारात दोन प्रकारची ५ रुपयांची नाणी चलनात आहेत. एक पितळेचं आणि दुसरे जाड धातूचे. यापैकी आता जाड धातूच्या नाण्यांची छपाई बंद केली आहे. या मागचे कारण जाणून घेऊया.

केंद्र सरकारच्या परवानगीने नाण्यांची छपाई करून ती देशात चलनात आणली जाते. सरकार रिझर्व्ह बँकेला सूचना देते आणि त्यानंतर आरबीआय नाणी बाजारात आणते. पण, कोणतेही नाणे किंवा नोट बंदीचा निर्णयही सरकारच्या संमतीनेच घेतला जातो.

जाड धातूपासून बनवलेल्या पाच रुपयांच्या नाण्यांमागे मोठी समस्या आहे. ही नाणी ब्लेड बनवण्यासाठी वापरली जात आहेत. एका जाड पाच रुपयांच्या नाण्यापासून ४-५ ब्लेड बनवता येतात, त्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळेच सरकार आणि आरबीआयने हळूहळू ही नाणी बाजारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या भारतात १ रुपयांपासून २० रुपयांपर्यंतची नाणी चलनात आहेत. वेळोवेळी ३० आणि ५० रुपयांची नाणी चलनात आणल्याच्या बातम्याही समोर येतात. मात्र, सध्या ५ रुपयांच्या जाड नाण्यांवर बंदी आल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.

सध्या पितळेची पाच रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जाड धातूंच्या नाण्यांची छपाई पूर्णपणे बंद करण्यात आली असून ती आता क्वचितच पाहायला मिळतात.

सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांवर विशेष परिणाम होणार नसला तरी देशाच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाच्या दिशेने नेण्यासाठी हे एक पाऊल ठरू शकते.