Tax Planning करणाऱ्यांसाठी पोस्ट ॲाफिसच्या जबरदस्त ५ स्कीम्स; कर बचतीसह मिळेल मोठा रिटर्न
By जयदीप दाभोळकर | Updated: March 25, 2025 09:14 IST2025-03-25T09:07:47+5:302025-03-25T09:14:46+5:30
Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.

Tax Saving Post Office Schemes: मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे इन्कम टॅक्सप्लॅनिंगसाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. ३१ मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही कारण १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अशा ५ योजना आहेत ज्या तुम्हाला उत्तम परतावा देण्यासोबतच इन्कम टॅक्स वाचवण्यास मदत करू शकतात. जाणून घेऊया या स्कीम्सबद्दल.
पीपीएफ
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही लोकांची आवडती योजना आहे. या योजनेत तुम्हाला ७.१% दरानं व्याज दिलं जात आहे. ही योजना १५ वर्षांनंतर मॅच्युअर होत आहे. यामध्ये एका आर्थिक वर्षात वर्षाला किमान ५०० आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. ही योजना तुम्हाला दीर्घ मुदतीत मोठा पैसा कमावण्यास मदत करू शकते. ही योजना ईईई श्रेणीत ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ही योजना गुंतवणूक, परतावा आणि मॅच्युरिटीवर कर लाभ देते.
एसएसवाय
जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तुम्ही तिच्या नावानं सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत ८.२ टक्के व्याज मिळत आहे. तुम्ही वर्षाला २५० ते १.५ लाख रुपये जमा करू शकता. ही रक्कम १५ वर्षांसाठी जमा केली जाते आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर व्याजासह संपूर्ण रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते. पीपीएफप्रमाणेच ही योजनाही ईईई श्रेणीत येते, ज्यामध्ये गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम या तिन्ही करमुक्त आहेत.
पोस्ट ऑफिस टीडी
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, ज्याला पोस्ट ऑफिस एफडी असंही म्हणतात, आपण त्यात गुंतवणूक करून कर वाचवू शकता, परंतु यासाठी आपल्याला ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. ५ वर्षांच्या एफडीवर टॅक्स बेनिफिट मिळतात, कमी मुदतीच्या एफडीवर टॅक्स बेनिफिट मिळत नाही. पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% व्याज देत आहे. यामध्ये आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर वजावटीचा दावा करता येतो.
एनएससी
पोस्ट ऑफिस एफडीप्रमाणेच एनएससीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही नफ्यासोबत टॅक्स बेनिफिटही मिळवू शकता. एनएससीमध्ये १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये कमाल मर्यादा नसते. त्यावर सध्या ७.७ टक्के व्याज दिलं जात आहे. यात ५ वर्षांसाठी गुंतवणूक ही करता येते. यामध्ये तुम्ही ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची कर वजावट देखील मिळवू शकता.
SCSSS
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्याचं नावावरुनच कळलं असेल. या योजनेत ज्येष्ठ नागरिक ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात आणि कर वाचवू शकतात. आपण १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेवर ८.२ टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८० सी अंतर्गत करसवलतीचा दावा केला जाऊ शकतो. पण त्यात मिळणारं व्याज करपात्र असतं.